Tur Farming: खादगावच्या शिवाराला तुरीची साथ

Indian Agriculture: पाऊस काळ चांगला असला की गोदावरीला पाणी राहतं. पाणी असलं की समृद्धी येते. याचबरोबर तुरीचं सुधारित वाण गावात आलं आणि आमच्या उत्पादनवाढीला दिशा मिळाली. हे प्रातिनिधीक बोल आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खादगाव (ता. पैठण) येथील शेतकरी निळकंठ किसनराव डाके यांचे. गावातील बहुतेक शेतकऱ्यांचा हाच अनुभव आहे.

खादगाव शिवारात सुमारे दहा वर्षांपूर्वी कापूस, ज्वारी, बाजरी अशी पिके असायची. ज्यांच्याकडे काही प्रमाणात पाण्याची उपलब्धता आहे त्यांच्याकडे मोसंबी, ऊस असे. मागील दहा वर्षांपासून चित्र बदलण्यास सुरवात झाली. फळपिकांकडे बहुतांश शेतकऱ्यांचा ओढा दिसत आहे. खरिपात तुरीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सुधारित तंत्रज्ञानाचा स्वीकार गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वाढवला आहे.

गोदावरी वाणाला पसंती

अलीकडील दहा वर्षात निखळ तुरीसह सोयाबीन अधिक तूर, कपाशी अधिक तूर अशी पीकपद्धती निवडल्याचे दिसते. सुरवातीला परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत बदनापूर कृषी संशोधन केंद्रातर्फे संशोधित बीडीएन ७११ या तुरीच्या वाणाला पसंती होती.

कोरडवाहू भागासाठी फायदेशीर ठरणारे हे वाण शेतकऱ्यांनी काही वर्षे घेतले. एकरी सात- आठ क्विंटलपर्यंत त्याचे उत्पादन मिळाले. अलीकडच्या चार वर्षात मात्र तुरीच्या गोदावरी अर्थात बीडीएन २०१३-४१ वाणाला पसंती दिली आहे. या वाणाबरोबरच व्यवस्थापनात सुधारणा करून एकरी १० ते १२ क्विंटल किंवा पूर्वीच्या तुलनेत २० टक्के किंवा त्याहून अधिक उत्पादनवाढ त्यांनी साध्य केली आहे.

क्षेत्रात सातत्य, बियाणे म्हणून विक्री

तुरीचं गोदावरी वाण शिवारात विस्तारण्यासाठी खादगावातील शेतकऱ्यांनी गावातीलच शेतकऱ्यांना त्याची बियाणे म्हणून विक्री केली. त्यातून मागील तीन वर्षांपासून सुमारे ७०० ते त्याहून अधिक एकरांच्या दरम्यान त्याचा विस्तार झाला आहे. गावातील पंधरा ते वीस शेतकऱ्यांकडून मराठवाड्यातील विविध जिल्हे. विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागापर्यंत वाणाचा प्रसार झाला आहे. मागील वर्षी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मनी तसेच गोदावरी वाणाचे संशोधक डॉ. दीपक पाटील व बदनापूर कृषी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी गावातील सोपान डाके यांच्या तुरीच्या प्रक्षेत्राला भेट दिली होती. त्यावेळी मिळालेल्या उत्पादनाविषयी समाधान व्यक्त केले होते.

सूक्ष्म सिंचनाचा वापर वाढला

खादगावच्या शेती शिवाराला सिंचनासाठी इनायतपूरच्या पाझर तलावासह शिवारातील सव्वातीनशेच्या आसपास असलेल्या विहिरींची जोड आहे. तर सव्वाचारशे च्या आसपास शेततळ्यांचा आधार आहे. शिवारातील सुमारे ७० टक्के क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. पिकाची गरज व पाण्याच्या उपलब्धतेनुसार काही पिकांना मोकळे पाणी देण्याचा पर्याय शेतकरी निवडतात.

परंतु सूक्ष्म सिंचनाचा वापर सर्वाधिक असून स्प्रिंकलरद्वारे पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. पावसाळ्यात झालेल्या जोरदार पावसामुळे खादगाव शिवारातील भूजल पातळीत वाढ झाली. शिवाय काही जलस्त्रोतांना बऱ्यापैकी पाणी आताच्या घडीला उपलब्ध आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नोव्हेंबर नंतर ऊस लागवडीला प्राधान्य दिले आहे. तुरीचे पीक काढल्यानंतरही अगदी आताआतापर्यंत ऊस लागवडीची धावपळ शिवारात दिसते आहे. फळ पिकांचे शिवारातील क्षेत्र सुमारे साडेतीनशे हेक्टरच्या आसपास असून मोसंबीचे सर्वाधिक तर त्याला डाळिंबाची जोड आहे.

काही प्रमाणात सीताफळ,केळी पीकही शेतकरी घेतात. रब्बीत काही प्रमाणात कांदा व गहू पिकाला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. गावातील पीक पद्धती व क्षेत्राचा विचार केल्यास कृषी विभागाच्या स्त्रोतानुसार सोयाबीन ७१ हेक्टर, सोयाबीन अधिक तूर ६४ हेक्टर, कापूस ९९५ हेक्टर, कापूस अधिक तूर १०६ हेक्टर, निव्वळ तूर ७३ हेक्टर व बाकी बाजरी, मका यांचे काही हेक्टर क्षेत्र आहे. फळबागांमध्ये मोसंबी, डाळिंब व अन्य मिळून ३१६ हेक्टर क्षेत्र आहे.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart