
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांची प्रकृती आता पूर्णपणे सुधारली असून, त्यांना मुंबईतील सुप्रसिद्ध एच. एन. रिलायन्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या सात दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
.
मिळालेल्या माहितीनुसार, आठवड्याभरापूर्वी तेजस ठाकरे यांना आरोग्यविषयक काही तक्रारी जाणवू लागल्या होत्या. वैद्यकीय तपासणी केली असता त्यांना संसर्ग झाल्याचे समोर आले. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना तात्काळ एच. एन. रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर एका आठवड्यापासून उपचार सुरू होते.
प्रकृतीत वेगाने सुधारणा
वैद्यकीय उपचारांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर तेजस यांच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाली. त्यानंतर आज डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली. तेजस ठाकरे आता आपल्या निवासस्थानी परतले असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने ठाकरे कुटुंब, स्नेही आणि कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
राजकारणापासून दूर, वन्यजीव संशोधक म्हणून ओळख
तेजस ठाकरे हे सक्रिय राजकारणापासून दूर असले तरी, वन्यजीव संशोधक म्हणून त्यांची मोठी ओळख आहे. पश्चिम घाटात वन्यजीव संशोधनादरम्यान त्यांनी पाली, खेकडे, सरडे तसेच दुर्मिळ माशाच्या प्रजाती शोधल्या आहेत. अंबोली येथील संशोधनादरम्यान त्यांनी शिस्तुरा हिरण्यकेशी ही माशाची दुर्मिळ प्रजाती शोधली होती. राजकारणापेक्षा जंगल सफारीत अधिक रस असल्याचे मत त्यांनी मनमोकळेपणाने व्यक्त केले आहे.
तेजस ठाकरे यांनी आतापर्यंत वन्यजीवांच्या 60 हून अधिक नवीन प्रजातींचा शोध लावला आहे. त्यांच्या या कार्याची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली असून, तामिळनाडूमध्ये सापडलेल्या ‘गेको’ (पाल) च्या एका प्रजातीला तेजस ठाकरेंचे नाव देण्यात आले आहे.
संशोधन क्षेत्रातील योगदान
तेजस ठाकरे यांना स्नेही आणि मित्रपरिवारात ‘TT’ या नावाने ओळखले जाते. 2012 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे त्यांनी केलेल्या पहिल्या ‘हर्पिंग’ ट्रिपमध्ये एका नवीन माशाचा शोध लागला होता, ज्याला पुढे ‘शिस्तुरा हिरण्यकेशी’ असे नाव देण्यात आले. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या भागाला ‘बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईट’चा दर्जा मिळाला होता. जरी ते राजकीय सभांमध्ये अधूनमधून दिसत असले, तरी वन्यजीव छायाचित्रण आणि पर्यावरण रक्षण हेच त्यांच्या आवडीचे क्षेत्र राहिले आहे.
हे ही वाचा…
सरकारची कामे गलगोटिया विद्यापीठासारखी बनावट:आदित्य ठाकरेंचा घणाघात, राज्यसभेच्या जागेवरही ठोकला दावा
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाच्या सुशोभिकरणाच्या कामाचा शुभारंभ आज शिवजयंती निमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांच्या उपस्थित श्रीफळ वाढवून करण्यात आला. मात्र, या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी राजकीय मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर टीकेची तोफ डागली. विशेषतः दिल्लीतील ‘रोबोटिक कुत्र्या’च्या वादावरून त्यांनी राज्य सरकारची तुलना ‘बनावट’ कामांशी केली. यासोबत आदित्य ठाकरे यांनी राज्यसभा निवडणुकीवर भाष्य करताना, एका जागेवर दावा ठोकला आहे. सविस्तर वाचा…