Mangalwedha Water Crisis: मंगळवेढा : उजनी लाभक्षेत्रातील निंगिरा ओढ्यावर बांधलेले सिमेंट बंधारे कोरडेठाक पडल्यामुळे परिसरातील शेती व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उजनी धरणातून पाणी सोडून हे बंधारे भरून द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून जोर धरत आहे.
तालुक्यात नदीकाठच्या पारंपरिक बागायती क्षेत्राबरोबरच उजनी कालव्यामुळे सिंचनाखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी बँका व पतसंस्थांच्या कर्जाच्या साह्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन बागायती पिके घेतली; मात्र उजनीतून पाणी सोडण्याची पाळी लांबणीवर पडल्यास पीक उत्पादनावर परिणाम होऊन त्याचे विपरीत परिणाम कर्जफेडीवरही होत आहेत.
भीमा नदीपात्रात पाणी न सोडल्याचा मुद्दा नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही चर्चेत होता. दरम्यान, उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असून, सध्या कालव्यातूनही पाणी सोडले जात आहे. मात्र, निंगिरा ओढ्यावर असलेले पाचपेक्षा अधिक सिमेंट बंधारे अद्याप कोरडेच आहेत. या बंधाऱ्यांमुळे परिसरात बागायती क्षेत्र वाढले असून, ते भरल्यास उन्हाळ्यात शेतीपिके व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकते.
उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पिके व जनावरे वाचवण्यासाठी तातडीने पाणी सोडण्याची गरज व्यक्त होत आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे मागणी केली असून, त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पाणी सोडण्याबाबत पाठपुरावा केल्याचे सांगितले जाते. तथापि, ओढ्याला कालव्याचा दर्जा नसल्याने पाणी सोडता येत नसल्याची प्राथमिक माहिती विभागीय कर्मचाऱ्यांनी दिली. यापूर्वी या ओढ्यात पाणी सोडण्यात आल्याचे सांगितल्यावर याबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ अधिकारी घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.