कोकणात पर्यटन वाढले तरी तेथील समुद्रकिनारे आणि त्यातील पाणी स्वच्छ राहील, ही काळजी स्थानिकांसह पर्यटकांनी घ्यायला हवी. असे झाले तरच डॉल्फिनसह समुद्रातील इतरही जीवसृष्टी सुरक्षित राहील.
कोकणामध्ये डॉल्फिनचा आढळ असलेल्या परिसरात समुद्रसैर करताना एक किंवा दोन डॉल्फिनचे दर्शन नेहमीच घडते. डॉल्फिन हा कळपाने राहणारा जीव असल्याने दहा ते पंधरा डॉल्फिन चा कळपही काही वेळा दिसतो. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किनाऱ्यावर एकाच वेळी तब्बल ७० ते ७५ डॉल्फिनचा मोठा कळप अभ्यासकांच्या नजरेस नुकताच पडला आहे. ही अत्यंत दुर्मीळ तेवढीच रोमांचक आणि सर्वांनाच विचार करायला लावणारी घटना म्हणावी लागेल. डॉल्फिनच्या अनेक प्रजाती आहेत.
परंतु भारतात प्रामुख्याने गोड्या पाण्यातील आणि खाऱ्या पाण्यातील ह्या प्रजाती आढळून येतात. कोकण किनारपट्टीत आढळणारे डॉल्फिन हे हंपबॅक प्रकारातील आहेत. गंगा नदीतील डॉल्फिनला राष्ट्रीय जलचर म्हणून घोषित केले आहे. भारतात नदी तसेच सरोवरात आढळणारे डॉल्फिन हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्यांचा समावेश वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये देखील करण्यात आला आहे. त्या तुलनेत समुद्रातील डॉल्फिन थोडे सुरक्षित आहेत. ज्या भागात समुद्रकिनारे आणि त्यातील पाणीही स्वच्छ आहे.
पर्यटकांचा वावर कमी आहे. त्या भागात डॉल्फिनचा अधिवास बऱ्यापैकी दिसतो. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी परिक्षेत्र हा अजून तरी बऱ्यापैकी प्रदूषणमुक्त आहे. पर्यटकांची संख्याही या भागात कमी असल्याने समुद्रकिनारी शांत वातावरण आहे. मर्यादित पर्यटकांकडून डॉल्फिनच्या अधिवास क्षेत्रात सध्यातरी हस्तक्षेप नाही. त्यामुळे या परिसरातील डॉल्फिनचा आढळ सध्या तरी टिकून आहे.
डॉल्फिनला जलचरातील बुद्धिमान प्राण्यांपैकी एक मानले जाते. डॉल्फिन आवाज आणि शीळ काढून एक दुसऱ्याशी संवाद साधतात. आपल्या कंपनयुक्त आवाजाने शिकारीचा अंदाजही घेतात. डॉल्फिन अतिशय संवेदनशील असून त्याची स्पर्शशक्ती दांडगी असते. मासे, झिंगे हे डॉल्फिनचे अन्न आहे. आपल्या देशातील नदी, सरोवरातील डॉल्फिन नामशेष होण्याचे मुख्य कारण नदीचे वाढते प्रदूषण हे आहे. डॉल्फिनची चरबी औषधी उपयुक्त असल्याच्या समजुतीपोटी त्यांची शिकारही मोठ्या प्रमाणात केली जाते.
डॉल्फिनचा वावर असलेल्या क्षेत्रात मानवी हस्तक्षेप वाढला, त्यांच्या मार्गात अडथळे आणले की त्यांचे अस्तित्व धोक्यात येते, हे लक्षात घ्यायला हवे. आज आपण पाहतोय शहरीकरण आणि औद्योगिकरण वाढत असल्याने प्रामुख्याने रायगड, ठाणे, पालघर परिसरात समुद्रातील पाण्याचे प्रदुषण वाढत आहे. याबरोबरच खोल समुद्रातील कमी ऑक्सिजनमुळे मासे किनारी अथवा उथळ भागात स्थलांतर करीत असताना हे मासे अनैसर्गिक पद्धतीने पकडले जात आहेत. त्यामुळे त्यांचा साठा कमी होत आहे.
बेकायदेशीर पर्ससीन मासेमारीचा अतिरेक त्यात एलईडी दिव्यांचा वापर करून केल्या जाणाऱ्या मासेमारीने अनेक मत्स्य प्रजाती नष्ट होत आहेत. समुद्रातील हे प्रदुषण वाढत गेले, अनियंत्रित मासेमारी, डॉल्फिनची अवैध शिकार सुरुच राहीली तर समुद्रातील डॉल्फिनसुद्धा नामशेष होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे अवैध, अनियंत्रित मासेमारी त्वरीत थांबवावी लागणार आहे. विकासाच्या नावाखाली कोकणाच्या पर्यावरणाला धोकादायक ठरतील, असे प्रकल्प कोकणात आणू नयेत.
कोकणातील निसर्ग आता देश-विदेशातील पर्यटकांना भूरळ घालत आहे. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या अनेक संधी देखील मिळाल्या आहेत. त्यामुळे कोकणात पर्यटन वाढले तरी तेथील समुद्रकिनारे आणि त्यातील पाणी स्वच्छ राहील, ही काळजी स्थानिकांसह पर्यटकांनी घ्यायला हवी. असे झाले तरच डॉल्फिनसह समुद्रातील इतरही जीवसृष्टी सुरक्षित राहील.