Dombivli : डोंबिवलीत डॉक्टर-वकिलांच्या घरांची आधी 'रेकी', मग धाडसी घरफोडी; दरोडेखोरांचा थरार सीसीटीव्हीत कैद

  • मिलापनगर बंगल्यात मध्यरात्री दरोडेखोरांची घुसखोरी

  • वृद्ध महिलेच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला

  • सीसीटीव्हीत आधी रेकी केल्याचे उघड

  • वाढत्या घरफोड्यांमुळे रहिवाशांकडून पोलीस गस्ती वाढवण्याची मागणी

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली

डोंबिवलीतील देसले पाडा येथे लग्नाला बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या घरावर चोरट्यांनी हात साफ केला. ही घटना ताजी असतानाच डोंबिवली एमआयडीसी परिसरातील मिलापनगर येथे एका बंगल्यात रात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी रेकी करून घुसखोरी केली. मात्र घरातील वृद्ध महिलेमुळे त्यांचा डाव फसला आणि त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान डोंबिवली पूर्व भागात चोरीच्या घटना वाढल्या असून हे संतापजनक आहे.

डोंबिवली एमआयडीसी, मिलापनगर हा विशेष करून बंगल्यांचा परिसर असून कारखानदार, डॉक्टर, सीए, वकील, शासकीय/खाजगी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी इत्यादी उच्चभ्रू लोकांची वस्ती येथे आहे. महाशिवरात्री दिवशी दिनांक 15 फेब्रुवारी रोजी रात्री अडीच वाजता दरम्यान मिलापनगर, एमआयडीसी मधील अभिनव सहकारी बँकेच्या समोरील एका बंगल्यात एक वृद्ध स्त्री घरात एकटीच असताना बंगल्याचे खिडकीचे ग्रील तोडून तीन दरोडेखोरांनी बंगल्यात प्रवेश केला. त्यापूर्वी एका दरोडेखोराने त्याच रात्री 1.25 वाजता या बंगल्यात रेकी करून गेल्याचे सीसी कॅमेरात दिसत आहे. दरोडेखोरांचा हातात कोयते व इतर हत्यारे होती.

बंगल्यात कोणीतरी असल्याचे व सदर वृद्ध स्त्री जागी झाल्याचे समजताच त्या तीन दरोडेखोरांनी ‘भागो’ बोलत पलायन केले. यानंतर त्या वृद्ध स्त्रीने शेजारी राहणाऱ्यांना फोन करून माहिती दिली असता, त्यांनी मदतीसाठी प्रत्यक्ष येऊन पोलिसांना कळविले. काहीवेळातच मानपाडा पोलीस घटनास्थळी येऊन त्यांनी चौकशी करून दरोडेखोरांना पकडण्यासाठी एक पथक रवाना केले. परंतु दरोडेखोर तोपर्यंत पसार झाल्याने मानपाडा पोलीस या दरोडेखोरांना पकडण्यासाठी सीसी कॅमेराद्वारे त्यांचा तपास करीत आहेत.

विशेष म्हणजे या बंगल्याच्या रांगेतच जवळ एका मोठ्या लोकप्रतिनिधीचा बंगला आहे.यापूर्वीही मिलापनगर परिसरात अशा घरफोड्या झाल्या असल्याने येथील रहिवाशांत घबराट पसरली असून रात्री/पहाटे पोलीस गस्ती वाढवावी आणि या दरोडेखोरांना जेरबंद करावे अशी मागणी मिलापनगर रेसिडेन्ट्स वेलफेअर असोसिएशनने पत्राद्वारे केली आहे.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart