Live-in relationship crime circumstances : भोपाळमध्ये इन्स्टाग्रामवर सुरू झालेल्या एका प्रेमसंबंधाचा अत्यंत भयंकर शेवट झाला आहे. महाराष्ट्रातील एका ३३ वर्षीय महिलेची भोपाळमध्ये हत्या करून मृतदेह चक्क सेप्टिक टॅंकमध्ये फेकून देण्यात आला. ही संपूर्ण घटना एखाद्या चित्रपटासारखी सुन्न करणारी आहे. मृत महिलेचे नाव आश्रफी उर्फ सिया असे आहे. तर आरोपीचे नाव समीर असे आहे. दोघांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. पण या प्रेमाचा भयनक शेवट झाला. समीरने सियाचा गळा दाबून खून केला. मृतदेह लोखंडी पेटीत भरला अन् सेफ्टी टँकमध्ये फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
मृत महिलेचे नाव आश्रफी उर्फ सिया होते. ती मूळची महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याची होती. वर्षभरापूर्वी सियाची ओळख भोपाळच्या समीर नावाच्या व्यक्तीशी ‘इन्स्टाग्राम’वर झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि समीरसोबत राहण्यासाठी सिया आपले घर सोडून तीन महिन्यांपूर्वी भोपाळला गेली होती. समीर हा रिक्षा चालक असून २ मुलांचा बाप असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झालेय.
समीर हा आधीच विवाहित होता आणि त्याला दोन मुले होती. सिया त्याच्यासोबत राहू लागल्याने घरात रोज भांडणे होऊ लागली. सिया समीरकडे लग्नासाठी तगादा लावत होती. लग्नास नकार दिल्यास ५ लाख रुपयांची मागणी करत होती. या रोजच्या कटकटीला कंटाळून समीरच्या पत्नीने घर सोडले आणि ती माहेरी निघून गेली होती. त्यामुळे दोघांचा वाद आणखी वाढत गेला.
सोमवारी संध्याकाळी सिया आणि समीरमध्ये जोरात भांडण झाले. रागाच्या भरात समीरने सियाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने आपल्या आई, भाऊ आणि बहिणीची मदत घेतली. त्यांनी सियाचा मृतदेह एका लोखंडी पेटीत भरला, त्यात जड दगड टाकले आणि रात्रीच्या अंधारात घराशेजारील एका रिकाम्या प्लॉटमधील सेप्टिक टॅंकमध्ये फेकून दिले.
गुरुवारी संध्याकाळच्या वेळी रिकाम्या प्लॉटमध्ये लहान मुले खेळत होती. त्या लहान मुलांना भयंकर दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. त्यांनी पाहिलं असता टाकीत एक पेटी तरंगताना दिसली. मुलांनी तात्काळ पालकांना कळवले. गांभीर्य पाहून रहिवाशांनी पोलिसांत याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी ती पेटी उघडली असता त्यात सियाचा कुजलेला मृतदेह आढळला.
मृतदेहाची अवस्था अतिशय खराब होती. कुजलेला मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर आव्हान होते. पण सियाच्या हातावर असलेल्या ‘दिव्या’च्या टॅटूवरून आणि त्यावर लिहिलेल्या जन्म रखेवरून पोलिसांनी ओळख पटवली. पोलिसांनी समीरचा भाऊ, आई आणि बहिणीला अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी समीर याला पोलिसांनी दोन दिवसानंतर बेड्या ठोकल्यात.