कडूस, ता. २० : खेड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभापतिपदी संदीप जाधव, उपसभापतिपदी विवेकानंद गायकवाड, तर सचिवपदी सुरेश आदक यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
खेड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे १२००पेक्षा अधिक शिक्षक सभासद असून, संस्थेकडे सध्या ४० कोटी रुपयांच्या ठेवी जमा आहेत. शिक्षक सभासदांना संस्था ३५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देते. या अग्रगण्य संस्थेचे सभापती तुकाराम शिंदे व उपसभापती गणेश दरवडे यांनी आपआपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदांसाठी राजगुरुनगर येथील शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात नुकतीच ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात सभापती, उपसभापती व सचिवपदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने बिनविरोध निवडीवर एकमताने शिक्कामोर्तब झाले. सभापतिपदी जाधव, उपसभापतिपदी गायकवाड व सचिवपदी आदक यांची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. नवनिर्वाचित सभापती, उपसभापती व सचिव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभेचे विभागीय अध्यक्ष शांताराम नेहेरे, राज्य प्रतिनिधी नामदेव गायकवाड, जिल्हा महिलाध्यक्ष प्रणोती लोंढे, तालुकाध्यक्ष नारायण करपे, तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष अभिजित नाईकरे, माजी अध्यक्ष विठ्ठल तांबे व शिक्षक सभासद उपस्थित होते. ‘ही निवडणूक बिनविरोध करून शिक्षकांनी एकोपा आणि प्रगल्भ सहकारी परंपरेचे दर्शन घडवले. संस्थेच्या उत्कर्षासाठी या पुढे काम करेन,’ असे मत नवनिर्वाचित सभापती जाधव यांनी व्यक्त केले. माजी सभापती सुनील वाघ यांनी आभार मानले.