महाबळेश्वर नगरपरिषदेला ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ राज्यस्तरीय गौरव

महाबळेश्‍‍वर पालिकेचा आज मुंबईत सन्‍मान

‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्‍ये द्वितीय क्रमांक; मुख्‍यमंत्र्यांकडून होणार पुरस्‍कार वितरण

महाबळेश्वर, ता. २० : निसर्गरम्य महाबळेश्वरने पुन्हा एकदा बाजी मारत ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ योजनेत यश मिळवले आहे. राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या अभियानात महाबळेश्‍‍वर पालिकेला राज्यस्तरावर सन्मान जाहीर झाला आहे. १५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्या गटात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्यात द्वितीय क्रमांक मिळाला असून, ‘भूमी’ घटकात दोन गुणांक मिळवत राज्यात प्रथम स्थान मिळवले आहे.
यानिमित्त उद्या (शनिवार) मुंबईत होणाऱ्या पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी मुख्याधिकारी योगेश पाटील, नगराध्यक्ष सुनील शिंदे तसेच ‘माझी वसुंधरा’ अभियानात कार्यरत पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे अभियान लोकप्रतिनिधींशिवाय प्रशासकीय कारकिर्दीत राबवले गेले, तेव्हा मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी एकजुटीने काम करून हे यश मिळवले आहे.
अभियानाच्या कालावधीत महाबळेश्वर पालिकेकडून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, जलसंधारण, हरित उपक्रम, प्लॅस्टिक निर्मूलन आणि नागरिकांचा सहभाग या विविध घटकांवर सातत्याने काम करण्यात आले. कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया आणि जमिनीच्या संवर्धनाबाबत तांत्रिक निकषांची पूर्तता करून प्रस्ताव सादर करण्यात आला होता. ‘भूमी’ घटकात प्रथम क्रमांक मिळणे हे प्रत्यक्षात राबवलेल्या कामांचे फलित मानले जात आहे.
नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे महाबळेश्वरला हा राज्यस्तरीय सन्मान मिळाला असून, पर्यावरणपूरक उपक्रमांना पुढेही सातत्य देण्याचा निर्धार नगरपरिषदेकडून व्यक्त करण्यात आला आहे.
………………………………………..
बोरिवली डोममध्‍ये रंगणार सोहळा
राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ उद्या (शनिवार) दुपारी १२ वाजता बोरिवली (प.) मुंबई येथील लाल बहादूर शास्‍त्री मार्गावरील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमच्‍या डोममध्‍ये होणार आहे. या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
………………………………………………

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart