PDR26B09417
पंढरपूर : क्रेडाई पंढरपूर आयोजित शिल्प अनावरण कार्यक्रमप्रसंगी उपस्थित माजी आमदार प्रशांत परिचारक, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, सहायक पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे आणि अन्य.
पंढरपुरात क्रेडाईकडून ॲबस्ट्रॅक्ट आर्टचे अनावरण
शहराच्या सौंदर्यात पडली भर; भाविकांसाठी आकर्षण
सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. २० : प्रगत पंढरपूर, सुंदर पंढरपूर हे ब्रीद समोर ठेवून शहराच्या सुशोभीकरणासाठी क्रेडाई (CREDAI) पंढरपूरने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. क्रेडाईतर्फे पंढरीतील पंत चौक आणि गजानन महाराज मठ परिसरात उभारण्यात आलेल्या आधुनिक संकल्पनेवर आधारित अॅबस्ट्रॅक्ट आर्ट (Abstract Art) शिल्पांचे अनावरण माजी आमदार प्रशांत परिचारक, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, सहायक पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले.
प्रशांतराव परिचारक म्हणाले, शहराच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी आणि सौंदर्यासाठी क्रेडाईने उचललेले हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे. अशा जागतिक दर्जाच्या कलाकृतींमुळे पंढरीच्या वैभवात भर पडली असून, भाविक आणि पर्यकांसाठी हे एक नवीन आकर्षण ठरेल. याप्रसंगी क्रेडाई पंढरपूरचे अध्यक्ष आशिष शहा व सचिव शशिकांत सुतार यांनी क्रेडाईच्या सामाजिक बांधिलकीबद्दल माहिती दिली.
शहराच्या विकासात आणि सुशोभीकरणात क्रेडाई नेहमीच अग्रेसर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सौंदर्यीकरण प्रकल्पासाठी निशिगंधा बँक यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले आहे. तसेच, पालवी संस्थेतर्फे घाटे परिवार यांच्या विशेष सहकार्यातून आणि स्मृतिप्रीत्यर्थ ही नयनरम्य शिल्पे साकारण्यात आली आहेत.
शहराच्या सौंदर्यीकरणाच्या या उपक्रमात क्रेडाई वूमन्स विंगने सक्रिय सहभाग नोंदवला. महिलांच्या या पुढाकाराचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
या अनावरण सोहळ्याला क्रेडाई पंढरपूरचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि पंढरपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, नगरसेवक तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.