परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे जाळ्यात?:ऐपत प्रमाणपत्रासाठी 50 हजारांच्या लाचेची मागणी, एसीबीची कारवाई

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे जाळ्यात?:ऐपत प्रमाणपत्रासाठी 50 हजारांच्या लाचेची मागणी, एसीबीची कारवाई
परळी येथील वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांचे नाव लाच प्रकरणात समोर आल्याने महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. सालंसी अर्थात ऐपत प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून तब्बल 50 हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीनंतर एसीबीने तात्काळ सापळा रचत कारवाई केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. सुरुवातीला 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, तडजोडीनंतर 20 हजार रुपयांवर व्यवहार ठरल्याची माहिती पुढे आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पथकाने प्राथमिक पडताळणी करून नियोजनबद्ध सापळा रचला. दरम्यान, तक्रारदाराच्या हालचालींवर संशय आल्याने तहसीलदार मुंडे यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचे सांगितले जात आहे. तरीदेखील एसीबीने आवश्यक पुरावे संकलित केले असून, संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील तपास बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे. या घटनेमुळे परळी तालुक्यातील महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली असून, जिल्हाभर या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. सामान्य नागरिकांकडून भ्रष्टाचाराविरोधातील या धडक कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व टिकवण्यासाठी अशा कठोर पावले आवश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील पुढील घडामोडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart