सोमाटणे, ता. २० : पवनमावळच्या पूर्व भागातील विविध शाळा, ग्रामस्थ आणि तरुण मंडळांच्या वतीने पालखी मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
पवनमावळातील छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय (शिवली), ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय (दिवड), पंचक्रोशी विद्यालय (दारुंब्रे), कर्मवीर विद्यालय (आढले), ग्राम प्रबोधिनी विद्यालय (साळुंब्रे), तुळजा भावानी विद्यालय (सोमाटणे), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (चांदखेड) आदी विद्यालयांमध्ये शिक्षक, ग्रामस्थ, सामाजिक संस्था आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून शिवजयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ आणि मावळा वेशातील बालविद्यार्थ्यांनी हातात भगवे झेंडे घेत सजवलेल्या पालखीत छत्रपतींची मूर्ती ठेवून ढोल-ताशा, लेझीमच्या गजरात आणि ‘जय शिवाजी, जय भवानी’च्या जयघोषात प्रत्येक गावातून उत्साहपूर्ण मिरवणुका काढण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या मिरवणुकांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ, तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या उपस्थितीत छत्रपतींच्या प्रतिमा आणि पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
सोमाटणे, गहुंजे, सांगवडे, साळुंब्रे, दारुंब्रे, गोडुंब्रे, चांदखेड, आढले, पाचाणे, कुसगाव, कासारसाई आदी गावांतही विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवली येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाच्या शिवजयंती उत्सवात संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ लोहोर, उपाध्यक्ष गुलाबराव वरघडे, सचिव शंकर आडकर आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते, अशी माहिती मुख्याध्यापक दत्तात्रेय जाधव यांनी दिली.
—