
प्रतिनिधी | अकोला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती भारतीय शेतकऱ्यांनी फ्रान्सची राजधानी पॅरीस येथे साजरी केली. युरोपात कृषी अभ्यास दौऱ्यात गेलेल्या शिवप्रेमींना जयंती उत्सव साजर केला. पॅरीसच्या भूमीवर भगव्याचा दणदणीत गजर ऐकायला मिळाला. कार्यक्रमादरम्यान ‘जय भवानी… जय शिवाजी’, च्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला. विदेशातही महाराष्ट्राचा भगवा दिमाखात फडकताना पाहून उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण झाला. शिवरायांच्या कार्याचा व स्वराज्य स्थापनेच्या इतिहासाचा उल्लेख करत त्यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त शेतकरी बांधवांनी एकजुटीचा आणि स्वाभिमानाचा संदेश दिला. कृषी अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने युरोपमध्ये एकत्र आलेल्या प्रतिनिधींनी शिवरायांच्या आदर्शांचा जागतिक स्तरावर गौरव करत शेतकरी सक्षमीकरणाचा संकल्प व्यक्त केला. विदेशात साजरी झालेली ही जयंती केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता स्वराज्याच्या विचारांचा जागतिक प्रसार करणारी ठरली. पॅरीसच्या भूमीवर घुमलेला शिवरायांचा जयघोष महाराष्ट्राच्या मातीचा मान उंचावणारा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.