
राज्यात सध्या राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. यात विधान परिषदेच्या एका जागेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आग्रही आहे. पण याच जागेसाठी काँग्रेस ठाकरे गटाशी भिन्न भूमिका मांडत आहे. यामुळे महाविकास आघाडीत या निवडणुकांवरून जोरदार राजकारण रंगण्याची शक्यता आहे. राज्यसभेच्या 10 राज्यांतील 37 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश आहे. याचवेळी राज्यात विधान परिषदेचीही निवडणूक होणार आहे. विद्यमान संख्याबळानुसार या दोन्ही निवडणुकांत महाविकास आघाडीच्या वाट्याला प्रत्येकी 1 अशा दोन जागा येणार आहेत. महाविकास आघाडीत सर्वाधिक संख्याबळ ठाकरे गटाकडे आहे. त्यामुळे या दोन्ही जागांवर त्यांनी दावा सांगितल्याची माहिती आहे. पण त्याचवेळी त्यांची मविआकडून शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचीही तयारी आहे. विधान परिषदेच्या एका जागेवर दस्तुरखुद्द उद्धव ठाकरेंना पाठवावे असा त्यांचा व्होरा आहे. तोडगा काढण्यासाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांत माथापच्ची दुसरीकडे, काँग्रेस या प्रकरणी भिन्न भूमिका मांडत आहे. शरद पवारांनी प्रथम सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसशी विलीनीकरण करण्याच्या मुद्यावरून आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर कुणाला पाठवायचे? व विधान परिषदेसाठी कोणता उमेदवार द्यायचा? यावरून विरोधी पक्षांत मोठी कुरघोडी होण्याची शक्यता आहे. पण महाविकास आघाडी या प्रकरण सर्वमान्य तोडगा काढण्याच्या प्रयत्नांत आहे. यासाठी काँग्रेस, शरद पवार गट व ठाकरे गटातील ज्येष्ठ नेते जोरदार माथापच्ची करत आहेत. विलीनीकरणाचा फटका टाळण्याचा आग्रह गत काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर ही चर्चा थंडावल्याची शक्यता आहे. पण शरद पवार गटाची विलीनीकरणासंबंधीची आग्रही भूमिका पाहता मविआत संभ्रमावस्था आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत विलीनीकरणाची चर्चा सुरू असल्यामुळे मविआने राज्यसभेची जागा शरद पवारांना देण्याऐवजी काँग्रेसला द्यावी. विशेषतः दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास त्याचा फटका ठाकरे गट व काँग्रेसला बसू शकतो. त्यामुळे मविआतील तिन्ही पक्षांनी विशेषतः शरद पवारांनी प्रथम विलीनीकरणाच्या मुद्यावर आपली बाजू स्पष्ट करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसला ठाकरे गटाची राज्यसभेसाठी शरद पवारांना व विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्याची भूमिका तत्वतः मान्य नाही. कारण, काँग्रेस 16 आमदारांसह मविआमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे. त्यामुळे ठाकरे व शरद पवार गट प्रत्येकी एक जागा घेत असतील तर काँग्रेसच्या वाट्याला काय येणार? असा प्रश्न काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे राज्यसभा किंवा विधान परिषदेची एक जागा आपल्याला मिळावी अशी त्यांची जागा आहे. शरद पवारांची विलीनीकरणाच्या मुद्यावर तळ्यात-मळ्यात भूमिका असेल तर त्यांना बाजूला ठेवून काँग्रेसने राज्यसभेसाठी व ठाकरे गटाने विधान परिषदेसाठी उमेदवार द्यावा, असाही काँग्रेसचा आग्रह आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर ठाकरे गट गांभिर्याने विचार करत असल्याचा दावाही केला जात आहे.