
प्रतिनिधी|अहिल्यानगर शिक्षणासोबतच चारित्र्य घडविणे हे विद्यालयाचे कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आत्मसात करून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आयुष्यात यशाचे शिखर गाठावे, हेच ध्येय घेऊन वाटचाल करावी असे आवाहन लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लक्ष्मीताई आहेर यांनी केले. कापड बाजार येथील लक्ष्मी भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यावेळी माध्यमिक विभागाच्या प्राचार्या छाया काकडे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लक्ष्मीताई आहेर, सांस्कृतिक विभागप्रमुख एस. एम. गारुडकर, एस. व्ही. दोमल, महादेव भद्रे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शिवगर्जना सादर करत वातावरणात उत्साह संचारला. समूहनृत्य, देशभक्तीपर गीते, प्रेरणादायी पोवाडे आणि प्रभावी भाषणांमधून विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांचा पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेचा इतिहास प्रभावीपणे सांगितला. काही विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक प्रसंग सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली.