
प्रतिनिधी | सोयगाव खासगी सावकाराच्या जाचास कंटाळून जरंडीत एका अल्पभूधारक कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि. १९) सकाळी घडली. दत्तात्रय रघुनाथ मुठ्ठे (६१) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मुठ्ठे यांची जरंडी शिवारात दोन एकर शेती होती. शेती मशागत आणि पेरणीसाठी त्यांनी बॅँका आणि खासगी सावकारी कर्ज रक्कम असे एकूण पाच लाख रुपये कर्ज घेतले होते. परंतु खासगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम फेडण्यासाठी त्यांना वारंवार फोनवर त्रास देण्यात येत होता. त्यामुळे वैतागून अल्पभूधारक शेतकऱ्याने घरातील पत्राच्या शेडमध्ये गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. मृताच्या खिशात सापडलेली चिठ्ठी व मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे. सोयगाव ग्रामीण रुग्णालयात डॉ. शैलेश खंदारे यांनी शवविच्छेदन केले. नंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी पाच वाजता मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत दत्तात्रय यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक पंकज बारवाल, उपनिरीक्षक गजानन आरेकर, अजय कोळी, गजानन दांडगे आदी करत आहेत. चिठ्ठीमधील मजकूर जशाच्या तसा मे. पोलिस अधिकारी साहेब सोयगाव, मी. दत्तू रघुनाथ मुठ्ठे लिहून देतो की, मी व्याजाने पैसे घेतले होते. त्याचे मी व्याज, मुद्दल देत आलो. दरवर्षी व्याज दिले तरी मुद्दल पैशांच्या चारपट पैसे दिले. पैसे फिटत नाही. सावकाराने मला दररोज फोन करून परेशान केले आहे. मी माझी चार एकर जमीन विकली तेव्हा पैसे दिले. आता माझ्याजवळ दोन एकर जमीन आहे. सावकाराचे म्हणणे आहे की जमीन विकून पैसे दे. मी माझ्या मुलाबाळांना काय देऊ? मला या लोकांनी त्रस्त करून टाकले आहे. तरी मी आत्महत्या करत आहे. ही चिट्ठी पोलिस अधिकाऱ्यांना देणे. पोलिस अधिकारी साहेबांनी माझ्या कुटंबीयांना मदत करावी.