
मोबाइल हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेल्या एका २३ वर्षांच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पोलिस उपनिरीक्षकाने पीडितेचा विश्वास संपादन करून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले आणि तिची इच्छा नसताना तीन वेळा गर्भपात घडवून आणल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकारी, त्याची पत्नी आणि मुलावर क्रांती चौक पोलिस ठाण्यात अत्याचार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. सुभाष चव्हाण, पत्नी नर्मदा चव्हाण आणि सागर चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत. पीडितेची तक्रार, तिच्याच शब्दांत… “मी मूळ नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असून, सध्या पुण्यात खासगी नोकरी करते. मार्च २०२५ मध्ये माझा मोबाइल हरवल्याने मी क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. तिथं माझी भेट पीएसआय सुभाष चव्हाण यांच्याशी झाली. त्यांनी माझा नंबर नोंदवून घेतला आणि त्याच रात्री फोन केला. त्यानंतर आमच्यात फोनवर बोलणं सुरू झालं आणि त्यांनी मला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. काही दिवसांनी त्यांनी माझा मोबाइल सापडल्याचं सांगून मला संभाजीनगरला बोलावलं. एका हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी गेल्यावर त्यांनी मला माझ्या जातीबाबत विचारणा केली. त्यानंतर त्यांनी मला लग्नाचे आमिष दाखवले. ‘मी तुझ्याशी लग्न करेन, तुला कधीच सोडणार नाही,’ असं म्हणत त्यांनी माझा विश्वास संपादन केला आणि शहरातील विविध लॉजवर नेऊन माझ्यावर वारंवार अत्याचार केले. त्यांनी मला अहिल्यानगर (अहमदनगर) येथे नेऊन गळ्यात बनावट मंगळसूत्र बांधून ‘आता तू माझी बायको आहेस,’ अशी खोटी हमी दिली. पुण्यात घडवून आणला गर्भपात मी गर्भवती राहिल्यानंतर त्यांनी माझी इच्छा नसताना पुण्यात माझा पहिला गर्भपात घडवून आणला. नोव्हेंबर २०२५ मध्ये संभाजीनगरमध्ये खोटं सांगून त्यांनी माझा दुसरा गर्भपात केला. जेव्हा मी लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा त्यांनी मला जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तुझ्यासारख्या मुलीशी मी लग्न करणार नाही “जानेवारी २०२६ मध्ये मी पुन्हा त्यांना भेटण्यासाठी आले असता, त्यांनी मला जातीवरून हीन वागणूक दिली. ‘मी उच्च जातीचा असून, तुझ्यासारख्या मुलीशी लग्न करणार नाही,’ असं म्हणत मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या पत्नी आणि मुलानंही मला गाठून मारहाण केली. आरोपीच्या पत्नीनं ‘माझ्या पतीचा पाठलाग सोडून दे,’ असं म्हणत पोटावर मारहाण केली. ज्यामध्ये माझा तिसऱ्यांदा गर्भपात झाला. सततची फसवणूक आणि शारीरिक-मानसिक छळाला कंटाळून अखेर मी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.