राज्यात पहिल्यांदाच भाजप नगरसेवक काँग्रेसप्रणीत आघाडीत:भिवंडीत मविआच्या पाठिंब्याने भाजपचे बंडखोर आज महापौर होण्याची शक्यता

राज्यात पहिल्यांदाच भाजप नगरसेवक काँग्रेसप्रणीत आघाडीत:भिवंडीत मविआच्या पाठिंब्याने भाजपचे बंडखोर आज महापौर होण्याची शक्यता
गेल्या बारा वर्षांत भाजपने काँग्रेसचे अनेक नगरसेवक, नेेते, माजी मंत्री फोडले. आता पहिल्यांदाच भिवंडी येथे उलटा प्रकार घडला आहे. २० फेब्रुवारीला होणाऱ्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे २२ पैकी १० नगरसेवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने स्थापन केलेल्या भिवंडी सेक्युलर आघाडीत सहभागी झाले आहेत. ९० जणांच्या मनपा सभागृहात सेक्युलर आघाडीकडे ५२ जण आहेत. बंडखोरांना रोखण्यासाठी भाजपने व्हीप जारी केला आहे. मात्र, त्याचा परिणाम होणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर भाजपच्या बंडखोर गटाचे नेते नारायण चौधरी महापौर होण्याची शक्यता आहे. ही फाटाफूट म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना मोठा धक्का मानला जात आहे. भाजपने आतापर्यंत केलेल्या फोडाफोडीला घोडेबाजार म्हणणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या फोडाफोडीचे प्रचंड कौतुक केले आहे. कशामुळे झाले एवढे मोठे बंड भाजपने महापौरपदासाठी नारायण चौधरींच्या नावाची घोषणा केली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी पडद्यामागून सूत्रे हलली आणि स्नेहा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे चौधरी आणि त्यांचे समर्थक नाराज झाले. निष्ठावंतांना डावलणे आम्हाला मान्य नाही, असे म्हणत त्यांनी मुंबईतील टिळक भवनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांची भेट घेतली आणि भिवंडी सेक्युलर आघाडीत प्रवेश केला. सेक्युलर आघाडीमागे खासदार बाळ्यामामा म्हात्रेंची रणनीती भाजपमधील खदखद पाहून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ‌भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्यामामा) यांनी सेक्युलर आघाडी स्थापनेची रणनिती आखली. काँग्रेसचे ३०, शरद पवार गटाचे १२ असे ४२ नगरसेवक त्यांच्यासोबत होते. येथे उद्धवसेनेला भोपळाही फोडला आला नाही. शिंदेसेना १२, समाजवादी पक्ष ६ अशी तिसरी आघाडी स्थापन झाल्याने सेक्यूलर आघाडीला महापौरपदासाठी किमान ४ नगरसेवकांची गरज होती. म्हणून त्यांनी भाजपला सुरूंग लावला. आता ही आघाडी ५२ पर्यंत पोहोचली आहे. आधी तीन ठिकाणी भाजपने केली काँग्रेस, मनसे, उद्धवसेनेची फोडाफोड गेल्या दीड महिन्यात भाजपने अंबरनाथ येथे काँग्रेसचे ११, चंद्रपूर येथे उद्धवसेनेचे ६ तर कल्याण-डोंबिवलीत मनसेचे ५ नगरसेवक फोडले होते. अॅनालिसिस – भाजप-शिंदेसेनेतील पुढील संघर्षाची बीजे भिवंडीत शिंदेसेनेने येथे भाजपला डावलून समाजवादी पक्षासोबत तिसरी आघाडी उघडली. त्यामुळे भिवंडीतील हा सत्तासंघर्ष मभाजप-शिंदेसेनेतील पुढील संघर्षाची बीजे पेरणारा आहे. अर्थात, भाजपमधील काही वरिष्ठ नेते विरोधकांच्या बळावर का होईना भाजपचा नगरसेवक महापौर होणे हा आपला विजयच असल्याचे मानत आहेत.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart