Case registered over Nitin Gadkari defamation on Instagram : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावरील रीलद्वारे दिशाभूल करणारी माहिती पसरविल्याची तक्रार भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलने केली असून, त्यावरून ही कारवाई करण्यात आली.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका अकाउंटवरून संबंधित रील पोस्ट करण्यात आली होती. या रीलमध्ये २००९ मधील एका प्रकरणाचा उल्लेख करत गडकरी व त्यांच्या कुटुंबीयांविषयी आक्षेपार्ह दावे करण्यात आले होते. ही रील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली.
भारतीय जनता पक्ष आयटी सेलचे अध्यक्ष शिशिर अरुण त्रिपाठी (रा. गांधीबाग) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ फेब्रुवारी रोजी कामकाजादरम्यान त्यांना संबंधित रील दिसली. त्यानंतर अशाच स्वरूपाच्या आणखी दोन पोस्ट आढळल्या. या पोस्टमधील मजकूर दिशाभूल करणारा असून, केंद्रीय मंत्र्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीची दखल घेत सायबर पोलिसांनी संबंधित इंस्टाग्राम अकाउंटधारक तसेच अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा आणि बदनामीसंदर्भातील कलमांन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.