medicine seized : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआर) धाडसी कारवाईनंतर गुन्हे शाखेने फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्यांदा एक लाख ११ हजार ९०० रुपये किमतीचे ११ ग्रॅम ३९० मिलीग्रॅम एमडी ड्रग्स जप्त केले.
संशयित सय्यद नाझिम सय्यद कासीम (वय ३५, रा. पटवा चौक, मसानगंज, अमरावती), असे अटकेतील व्यक्तीचे नाव असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी दिली. यापूर्वी गुन्हे शाखेने सात फेब्रुवारी २०२६ रोजी तीन लाख ८२ हजार रुपयांचे २५.५ ग्रॅम एमडी ड्रग्स संशयित अब्दुल शोएब अब्दुल जब्बार व सईद खान शरीफ खान या दोघांकडून जप्त केले होते. त्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी अॅकॅडमी हायस्कूलच्या मैदानातून संशयित समीर खान शमीम खान (वय १९) याला अटक करून १२ ग्रॅमचे एमडी ड्रग्स जप्त केले होते.
त्यानंतर १९ फेब्रुवारीला तिसऱ्यांदा ही कारवाई केली. त्यापूर्वी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने नवसारी रिंगरोडवरील एका कारमधून पाच किलो एमडी ड्रग्स जप्त करून चौघांना अटक केली होती. गुजरात, अहमदाबादच्या पथकाच्या टीपवर नागपूर डीआरआयने ही कारवाई केल्याने पोलिसांसह जिल्हा प्रशासनाची सुद्धा झोप उडाली होती.
पोलिसांच्या सातत्यपूर्ण अंमलीपदार्थ विरोधी कारवाईनंतरही त्याला अंकुश बसलेला दिसत नाही. त्यामुळे एमडी ड्रग्स छोट्या छोट्या प्रमाणात आणून त्याची विक्री ग्राहकांपर्यंत करणाऱ्यांची पाळेमुळे खोलवर रुतलेली असल्याचे दिसून येते. गुरुवारी (ता.१९) सय्यद नाझीम याला पहिल्यांदा गुन्हे शाखेने अटक केली. यापूर्वी तो अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात सापडलेला नव्हता. त्याच्याकडून एमएच २७ सीई ७८१३ क्रमांकाची ८० हजारांची दुचाकी व १० हजार रुपयांचा मोबाईल, असा एकूण दोन लाख एक हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयित सय्यद नाझीम याने सदर एमडी ड्रग्स कुणाकडून खरेदी केली, याची माहिती त्याने दिली नव्हती.
पोलिस उपनिरीक्षक गजानन सोनुने, सुनील लासूरकर, दीपक सुंदरकर, जहीर शेख, सचिन बहाळे, अतुल संभे, सूरज चव्हाण, राजिक रायलीवाले, चेतन कराळे, योगेश पवार, सुधीर गुडधे, राजेश मेंढे यांच्या पथकाने ही कारवाई केली.