
पारंपारिक वेशातील मावळे आणि सुवासिनी, हलगी, ढोल ताशाचा गजर, बहारदार डमरू वादन आणि रात्रीच्या अंधारात आकर्षक अग्नीलोळांचे शिवतांडव नृत्य अशा बहारदार कार्यक्रमांच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांची 395 वी जयंती साजरी करण्यात आली. भस्मरमय्या महाकाल मंडळ उज्जैन यांनी गांधी मैदानावर गोलाकार फेर धरत महाकालचा गजर केला. सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवरायांची 395 वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. सातारा शहरांमध्ये सातारा नगरपालिका आणि शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या तीन दिवसापासून आकर्षक व बहारदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सातारा शहरांमध्ये आकर्षक स्वागत कमानी आणि ठिकठिकाणी शिवमंच उभा करून तेथे छत्रपती शिवरायांची प्रतिमा स्थापित करण्यात आली होती. आकर्षक खड्या आवाजातील पोवाडे तसेच सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच पर जिल्ह्यातून येणाऱ्या ज्योतींचे स्वागत अजिंक्यतारा किल्ल्यावर असणाऱ्या राज सदरेला अभिवादन अशा विविध माध्यमातून सातारा नगरीने साक्षात शिवकाल अनुभवला. येथील छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये पत्रातून उलगडले शिवराय या विषयावर दुर्ग महर्षी प्रमोद मांडे यांचे व्याख्यान झाले. तसेच शिवाजी संग्रहालय दिवसभर शिवभक्तांसाठी खुले ठेवण्यात आले होते. शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी शिवभक्तांची गर्दी उसळली होती. महाकाय क्रेनच्या माध्यमातून शिवतीर्थावर अवकाशामध्ये गोलाकार पद्धतीची स्वागत कमान उभारण्यात येऊन त्याच्याखाली शिवतीर्थला आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली. संध्याकाळच्या मिरवणुकीचे आकर्षण ठरले ते भस्मरमय्या महाकाल उज्जैन मंडळाचे डमरू वादन आणि चर्चेचे असलेले शिवतांडव नृत्य. राजवाडा गांधी मैदान ते पवई नाका यादरम्यान चौकाचौकांमध्ये शिवतांडव नृत्याने बहार आणली. लयबद्ध नृत्य आणि आगीचे थरार खेळ सादर करून तंत्र साधकांनी शिवतांडव नृत्याचे वेगळेपण शिवजयंतीच्या निमित्ताने दाखवून दिले. श्री भस्मरमय्या उज्जैन मंडळाची दोन पथके या शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमात सहभागी झाली होती .त्यांनी गोल फेर गांधी मैदानावर धरून बहारदार डमरू आणि झांज नृत्य सादर केले. तसेच सातारा नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 15 येथील विद्यार्थ्यांचे सुद्धा लेझीम नृत्य लक्षवेधी ठरले. या मिरवणुकीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर सादर करण्यात आलेले आठ चित्ररथ सुद्धा शिवभक्तांचे आकर्षक ठरले. गांधी मैदानावरील व्यासपीठावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सातारकर नागरिकांनी आणि शिवभक्तांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित मुख्य मिरवणूक कार्यक्रमाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट दत्ता बनकर गटनेते अविनाश कदम, माजी नगराध्यक्ष निशांत पाटील सार्वजनिक बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे, नियोजन सभापती अशोक शेडगे, पाणीपुरवठा सभापती धनंजय जांभळे, महिला व बालकल्याण सभापती मोनिका घोरपडे, मागासवर्गीय समाज कल्याण विशेष समिती सभापती संकेत साठे, राजू गोरे तसेच शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मुख्य मिरवणूक गोलबाग राजपथावरून थेट पवई नाक्यावर गेली. या मिरवणुकीमध्ये सजवलेला हत्ती अंबारी झाला होता. पारंपारिक वेशातील मावळे व घोडे यांनी थेट शिवकालाची आठवण करून दिली. रात्री उशिरा शिवतीर्थावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती आणि शिव वंदना करण्यात येऊन नंतर फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली.