
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ॲक्सिस बँकेतील 23 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर वरिष्ठ उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. 23 वर्षांपूर्वी व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या अमृता फडणवीस यांनी या काळात शाखा संचालन, कॉर्पोरेट बँकिंग आणि ट्रेझरी यांसारख्या विविध विभागांमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. या प्रदीर्घ प्रवासानंतर अखेर त्यांनी वरिष्ठ पदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत माहिती दिली की, 23 वर्षांपूर्वी मी अॅक्सिस बँकेमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून रुजू झाले होते. आज मी कृतज्ञतेने भरलेल्या अंत:करणाने वरिष्ठ उपाध्यक्ष पदावरून निवृत्त होत आहे. या काळात मला शाखा व्यवस्थापनापासून ते कॉर्पोरेट बँकिंगपर्यंत आणि ट्रेझरीपासून ते कस्टमर रिलेशन विभागापर्यंतचा अनुभव मिळाला, त्यामुळे ही संस्था माझं कुटुंब, शिक्षक आणि दुसरं घर राहिली आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी बँकेचे एमडी आणि सीईओ अमिताभ चौधरी यांचे आभार देखील व्यक्त केले आहेत. बँकेतील माझे सर्व सहकारी आणि एमडी, सीईओ अमिताभ चौधरी यांच्या पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे, हा सुंदर अध्याय इथे संपत आहे, परंतु मी आयुष्यभराचे धडे आणि मैत्री घेऊन जात आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.