Ujani Dam Water: उजनीचे पाणी कर्नाटकने अडवले, नदीकाठची शेती धोक्यात

Ujani Dam Water: सोलापूरः उजनी धरणातून भीमा नदीत चार हजार ४०० क्युसेक पाणी सोडले. मात्र, कर्नाटकने त्यांच्या उमराणी बंधाऱ्यात हे पाणी अडवले आहे. त्यामुळे खालील गावांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तर मंद्रूपसह आठ गावांच्या पिण्याचा पाणीपुरवठा बंद पडला आहे. याबाबत प्रशासनाने सरकारकडे बोट दाखवल्याच्या लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

सहा फेब्रुवारी रोजी उजनीतून भीमा नदीत चार हजार ४०० क्युसेक पाणी सोडण्यात आले. मात्र, कर्नाटकने त्यांच्या उमराणी बंधाऱ्यात पाणी अडवले आहे. त्यामुळे हे पाणी खाली पोचू शकले नाही. परिणामी खालील लवंगी, पाटीलनगर, कारकल, औज, कुरघोट, टाकळी, बरूर, चिंचपूर येथील पिके धोक्यात आली आहेत. भीमा नदी कोरडी पडल्याने शेतीचा पाणीपुरवठा थांबला आहे. तर मंद्रूपसह या गावांतील पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही बंद पडला आहे. याबाबत मंद्रूपसह परिसरातील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनालाही निवेदन दिले आहे. परंतु अद्याप उमराणी बंधाऱ्यातून पाणी खाली न सोडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

उजनीतून अचानक पाणी सोडणे थांबवले

रब्बी पिकांसाठी उजनीतून १७ जानेवारीला पहिले आवर्तन सोडले. तेव्हा भीमा नदीतूनही पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यामुळे पाणी सोडण्यात आले. पण अचानक १३ फेब्रुवारी रोजी उजनीतून पाणी सोडणे थांबवण्यात आले. याबाबत प्रशासनाने ‘मौन’ पाळल्याने त्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही. परंतु कर्नाटकने पाणी अडवल्याने उजनीतून पाणी सोडणे थांबवल्याची चर्चा आहे.

सीनेतील पाण्यामुळे बरुरखालील गावांची सोय

उजनीतून सीना नदीतही पाणी सोडण्यात आले. सीनेतील पाणी खाली अक्कलकोट तालुक्याच्या शेवटपर्यंत पोचले आहे. त्यामुळे बरूरखालील गावांतील शेती व पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मात्र, लवंगी ते बरूरपर्यंतच्या नदीकाठावरील गावांतील शेती व पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली आहे.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart