Unnao Cricket Match Bee Attack : उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात बुधवारी शुक्लागंज येथील सप्रू स्टेडियममध्ये सुरू असलेल्या अंडर-13 क्रिकेट लीग सामन्यावर मधमाश्यांच्या झुंडीने अचानक हल्ला केल्याची एक भयानक घटना घडली.
एवढंच नाहीतर या हल्ल्यात वरिष्ठ कानपूर क्रिकेट असोसिएशन (केसीए) पंच माणिक गुप्ता यांचा मृत्यू झाला, तर १५-२० खेळाडू, आणखी एक पंच आणि मैदानातील कर्मचारी जखमी झाले.
मैदानाच्या सीमा भिंतीला लागून असलेल्या एका वडाच्या झाडावर मधमाशांचे पोळे होते. या ठिकाणी सकाळपासूनच मधमाश्या घिरट्या घालत होत्या. दरम्यान क्रिकेट सामन्यातील खेळाडूंच्या ड्रिंक्स ब्रेकच्या वेळी अचानक मैदानावर मधमाशांच्या झुंडीने शिरकाव केला. यामुळे सर्वांची एकच पळापळ झाली.
खेळाडू, पंच आणि इतरजण धावत सुटले. तर काहीजण जमिनीवर पडले, काहीजण तर काही मैदानावरील बाथरूममध्ये लपले. पण माणिक गुप्ता मैदानाजवळच बसलेले होते, नंतर तेही आश्रयासाठी धावत असताना खाली पडले आणि त्यानंतर ५० हून अधिक मधमाश्यांनी त्याला घेरले आणि सुमारे १० मिनिटे सतत त्यांना डंक मारले.
त्याच्या संपूर्ण शरीरावर मधमाशांच्या डंकाच्या खुणा होत्या. परिणामी त्यांना ताताडीने रूग्णालयात हलवले मात्र वाढत्या वयामुळे आणि हृदयरोगामुळे त्यांची प्रकृती झपाट्याने बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला.