ऐसा युगे युगे, स्मरणीय सर्वदा । जाणता राजा…

पिंपरी, ता. १९ ः युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भोसरी, दिघी, आकुर्डी, रावेत, पिंपळे सौदागर, काळेवाडी, किवळे आदी उपनगरांत स्वराज्य रथांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. तसेच विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले.

भोसरी ः छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या पुढाकाराने भोसरीत ‘एक गाव, एक शिवजयंती’ साजरी करण्यात आली. शिवरायांना ढोल-ताशांच्या गजरात मानवंदना देण्यात आली. मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
भोसरीतील राजमाता उड्डाणपुलाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बुधवारी (ता.१८) आठ ढोल-लेझीम पथकांद्वारे मानवंदना देण्यात आली. गुरुवारी (ता. १९) शिवस्मारकालगत आयोजित रक्तदान शिबिरात दीडशे नागरिकांनी रक्तदान केले. मोफत आरोग्य तपासणी शिबिरात शंभर नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. या सोहळ्याचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या पुढाकाराने फुगे-माने तालीम, लांडगे लिंबाची तालीम, गडकोट सेवेकरी, पठारे-लांडगे तालीम, कृपाताई फाउंडेशन ट्रस्ट, हिंदवी स्वराज्य ग्रुप, युवा प्रतिष्ठान, समस्त गव्हाणे तालीम, मधले फुगे तालीम, लोंढे तालीम, भवानी तालीम, छावा प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव, श्री भैरवनाथ दहीहंडी उत्सव, भैरवनाथ कबड्डी संघ, भैरवनाथ कबड्डी संस्था आणि भोसरी ग्रामस्थांनी केले.

रक्तदान शिबिर
भोसरीतील लांडेवाडी चौकात नवमहाराष्ट्र तरुण मंडळाद्वारे आयोजित विनामूल्य आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे उद्‍घाटन पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक विक्रांत लांडे, पंकज भालेकर, राहुल भोसले, भीमाबाई फुगे, माजी नगरसेवक विश्वनाथ लांडे, विक्रांत लांडे आदी उपस्थित होते. शिबिराचा अडीच हजार नागरिकांनी लाभ घेतला. रक्तदान शिबिरात दोनशे ६५ नागरिकांनी रक्तदान केले.

दिघीतही आरोग्य तपासणी
दिघी रस्त्यावरील आदर्श मित्र मंडळाद्वारे आयोजित विनामूल्य आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचे उद्‍घाटन कामगारनेते सचिन लांडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक जालिंदर शिंदे, सागर गवळी, सतीश गावडे, सागर सुरगुडे आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिरात २७ नागरिकांनी रक्तदान केले. तर आरोग्य तपासणी शिबिरात सव्वाशे नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. शिवशक्ती मित्र मंडळ आणि ब्रदर्स कंपनीद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची शिवरथात डीजे आणि ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक खंडोबामाळ, चांदणी चौक, पुणे-नाशिक महामार्गाचा सेवा रस्ता, भोसरी-आळंदी रस्ता चौक, आळंदी रस्ता, शास्त्री चौक आदी मार्गाने काढण्यात आली.

शिवजन्मोत्सव पाळणा
आकुर्डी : आकुर्डी परिसरात शिवजयंतीनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. सकाळपासूनच शिवभक्तांची मोठी उपस्थिती दिसून आली आणि परिसर शिवमय झाला. कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमा पूजन आणि शिवजन्मोत्सव पाळणा सोहळ्याने करण्यात आली. यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात काढण्यात आलेल्या स्वराज्य रथ मिरवणुकीने नागरिकांचे विशेष लक्ष वेधले. मिरवणुकीदरम्यान शिवचरित्रावर आधारित देखावे आणि पारंपरिक सादरीकरणे सादर करण्यात आली.

विकासनगर येथे अभिवादन
रावेत : फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचातर्फे, विकासनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात करण्यात आली. नगरसेवक बाळासाहेब तरस, बापू कातळे, सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी वानखेडे, सिंधू तंतरपाळे यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी संयोजक नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे, नीलेश तरस, राजेंद्र तरस, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नानासाहेब डोईफोडे, रवींद्र कदम, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवमय वातावरण
रावेत : शिवजयंतीनिमित्त रावेत परिसरात पारंपरिक विधी, सांस्कृतिक सादरीकरणे आणि मिरवणुकांमुळे परिसरात शिवमय वातावरण निर्माण झाले. रुनाल गेटवे, सेलिस्टियल, ग्रासिया, चंद्रभागा आदी सोसायट्यांमध्ये शिवजयंती अत्यंत उत्साहाने साजरी करण्यात आली. सद्‍गुरु चौक परिसरात श्री शिवछत्रपती मित्र मंडळाच्यावतीने आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके, शिवप्रतिमा पूजन आणि लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम हे सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले.

मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके
काळेवाडी : रहाटणी गाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त भव्य आणि उत्साहपूर्ण फेरीचे आयोजन करण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर पोवाडाही सादर केला. विद्यार्थ्यांनी लाठी-काठी पथकाने कसरती, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. काळेवाडी येथील श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर विद्यालय, एलबीटी इंग्लिश स्कूल, चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. विद्यार्थ्यांनी लक्षवेधक मानवी मनोरे रचले.

लाठी काठीचे सादरीकरण
पिंपळे सौदागर ः द रायका स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिरवणूक काढली. विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित भाषण व पोवाडे सादर केले. लेझीम पथकाचे सादरीकरण तसेच लाठी-काठी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
विद्यालयाच्या प्राचार्या पूनम रायका यांच्या हस्ते अभिवादन शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. नगरसेविका अनिता काटे, कुंदा भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उत्स्फूर्तपणे मिरवणूक
किवळे ः गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा, शिवस्तुती, शिवगर्जना आणि गीते सादर केली. तसेच ढोल – ताशा, लेझीमच्या गजरामध्ये उस्फूर्तपणे मिरवणूक काढण्यात आली. लेखक नरेंद्र पेंडसे, शाळेचे खजिनदार साहेबराव बोडके, व्यवस्थापिका पौर्णिमा बोडके, मुख्याध्यापिका विजिला राजकुमार आदी उपस्थित होते.

सांगवडेत अभिवादन
सांगवडेत शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. संत तुकाराम कारखान्याचे कार्यकारी संचालक साहेबराव पठारे, बाबासाहेब औटी आदी उपस्थित होते.

00329

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart