जुन्नर, ता. १९ : छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३९६वा शिवजन्म सोहळा किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) येथे उत्साहपूर्ण वातावरणात व जल्लोषात साजरा करण्यात आला. ‘जय जिजाऊ जय शिवराय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय’ या घोषणांनी शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीचे वातावरण शिवमय झाले होते.
किल्ले शिवनेरी येथे सकाळी नऊच्या सुमारास गडावरील शिवकुंज येथील राजमाता जिजाऊ व बालशिवबा यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिवजन्मस्थळ येथे बालशिवबा यांच्या जन्माचा सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बालशिवबा यांचा पाळणा जोजवून शिवजन्म सोहळा पार पडला. यावेळी मराठा सेवा संघाच्या वतीने मान्यवरांचे औक्षण करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाच्या महिलांनी पारंपरिक वेशभूषा व पारंपरिक पद्धतीने पाळणा गीत गायन केले. शिवजन्माचा आनंद सोहळा उपस्थितांना सुंठवडा व पेढे वाटून साजरा करण्यात आला. यानंतर महाराष्ट्र राज्याच्या पोलिस दलाच्या बँड पथकाकडून बंदुकीच्या फैरी झाडत छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओतूर क्रमांक एक व दोनच्या विद्यार्थ्यांनी गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली लेझीम पथकाच्या माध्यमातून सादर केलेल्या शिवचरित्रावर आधारित प्रसंग सादर केले. त्याचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.