‘त्या’ झोपडपट्टीधारकांना मिळणार घरे
रत्नागिरी होणार झोपडपट्टीमुक्त ; मंत्रालयात बैठक, ४० कोटीचा निधी अपेक्षित
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ ः रत्नागिरी शहर पूर्णपणे झोपडपट्टीमुक्त करण्याचा महत्वपू्र्ण निर्णय मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत घेण्यात आला आहे. शहरातील ७३० झोपडपट्टीधारकांना कायमस्वरूपी आणि हक्काची घरे देण्यात येणार असून, त्यासाठी ४० कोटींचा निधी लागणार आहे.
रत्नागिरी शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना हक्काचे छप्पर मिळावे आणि शहराचे सौंदर्य वाढावे, असा दुहेरी उद्देश या प्रकल्पामागे आहे. मंत्रालयात झालेल्या या बैठकीला पालकमंत्री उदय सामंत, रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांच्यासह नगरविकास विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी, म्हाडा आणि गृहनिर्माण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पासाठी सुमारे तीन एकर जागेची आवश्यकता असून, त्या जागेवर ७३० सुसज्ज घरे बांधण्यात येणार आहेत. या संपूर्ण गृहप्रकल्पासाठी सुमारे ४० कोटी निधीची गरज भासणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेचा आधार घेतला जाणार असून, उर्वरित निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या या योजनेमुळे रत्नागिरीतील शेकडो कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे.
—-
कोट
रत्नागिरीतील ७३० झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांना सुरक्षित आणि सोयीसुविधांनीयुक्त अशा घरात राहण्याची संधी मिळणार आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनशैलीत मोठा सकारात्मक बदल घडून येईल.
– समीर तिवरेकर, उपनगराध्यक्ष, रत्नागिरी