पिंपरी, ता. १९ ः प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथे दुचाकी वाहनांसाठी ‘एनसी’ ही नवीन नोंदणी मालिका सुरू झाली आहे. नव्या मालिकेतील आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक चारचाकी वाहनधारकांना तीनपट शुल्क भरून राखीव ठेवण्याची तर उर्वरित क्रमांकांसाठी दुचाकी वाहनधारकांकडून आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलावाद्वारे वाटप करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
नव्याने सुरू होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक व पसंतीचे क्रमांक तीनपट शुल्क भरून राखीव ठेवू इच्छिणाऱ्या चारचाकी वाहनधारकांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. उर्वरित आकर्षक नोंदणी क्रमांकांसाठी दुचाकी वाहनधारकांनी शुक्रवारी (ता. २०) सकाळी ११ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत अर्ज नवीन वाहननोंदणी विभागात सादर करावेत. अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड), पत्त्याचा पुरावा (आधारकार्ड, टेलिफोन बील इत्यादी), आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक, शुल्कासाठीचा डिमांड ड्राफ्ट “DYR.TO PIMPRI CHINCHWAD” या नावे कोणत्याही राष्ट्रीयकृत/अनुसूचित बँकेच्या पुणे शाखेवर देय असावा.
—