Sangli Takari Irrigation Scheme: वांगी, जि. सांगली : ताकारी उपसा जलसिंचन योजनेचे यंदाचे पहिले आवर्तन २७ नोव्हेंबर ते २९ जानेवारीअखेर सुरू होते. आवर्तनाच्या सुरुवातीला १५ दिवस वांगी भागाला दिलेले पाणी आटले आहे. पुनःश्च पाणी सोडावे, अशी मागणी लाभक्षेत्रातून होत आहे. पाणी तत्काळ न सोडल्यास पिके वाळून जाणार आहेत. लाभक्षेत्रातील गावांत पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण होणार आहे.
गतवर्षीच्या मुबलक पावसामुळे यंदा ताकारी योजना लवकर सुरू करण्याचा ‘लोड’ आला नाही. योजना तीन महिने उशिरा सुरू झाली. यातील पहिले आवर्तन २७ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरू झाले. त्यातील पहिल्यांदा १०-१५ दिवस परिसराला पाणी दिले. नंतर सलग ६४ दिवस योजना सुरू ठेवून पाणी मुख्य कालव्याच्या १४४ किलोमीटर सोनी-भोसेपर्यंत पोहोचविले. शेतीला दिलासा मिळाला होता.
त्यानंतर रब्बीसह वाढलेल्या सिंचनक्षेत्रासाठी महिनाभर जमिनीतून अखंडित होणारा पाणी उपसा, वाढलेला उन्हाळा आणि पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे पाणीपातळी भरभर खालावली. सर्व ओढे आटल्याने जलस्रोत ‘घायकुती’ला आलेत. बंदिस्त वितरण प्रणालीद्वारे वांगी भागात जमिनीत पाणी मुरण्यावर संकट आले आहे.
ताकारी पाटबंधारे विभागाने सद्यःस्थितीतील पाण्याची गरज ओळखून प्राधान्यक्रम ठरवून संबंधितांना तत्काळ पाणी पुरवावे, अशी मागणी होत आहे. त्वरित पाणी न सोडल्यास त्याचा बहुतांश गावांच्या शेती व पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांवरही परिणाम होणार आहे.
…अन्यथा दरवेळी वाद
शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरण्याचे आवाहन ‘पाटबंधारे’ने केले आहे. असंघटित शेतकऱ्यांचा या बाबीस प्रतिसाद मिळत नसल्याने ‘पाटबंधारे’ला ‘ताकारी’ सुरू करण्यात अडचणी येत आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची आवश्यकता आहे. पाणी नियमित वेळेत येण्याची गरज आहे. अन्यथा शेतकरी आणि पाटबंधारे यांच्यात दरवेळी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.