शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेसची अट:समर्थनाच्या बदल्यात हवी विधान परिषदेतील जागा? नव्या गणितामुळे महाविकास आघाडीची कसोटी

शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेसची अट:समर्थनाच्या बदल्यात हवी विधान परिषदेतील जागा? नव्या गणितामुळे महाविकास आघाडीची कसोटी
राज्यसभा निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यसभेसाठी पाठिंबा देताना काँग्रेस विधानपरिषदेतील एका जागेवर दावा करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्र निर्णय घ्यायचा असेल तर विधान परिषदेतही आघाडीतील घटक पक्षांना योग्य वाटा मिळायला हवा, अशी भूमिका काँग्रेस मांडू शकते, अशी माहिती समोर येत आहे. या विषयावर अंतिम निर्णय घेण्यासाठी दिल्लीमध्ये आघाडीतील नेते एकत्र बसून चर्चा करणार असल्याचे संकेत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे की, राज्यसभेच्या उमेदवारीबाबत निर्णय घेण्यापूर्वी सर्व घटक पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. दोन राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना नेमकी भूमिका काय असेल, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला तातडीने पाठिंबा देण्याऐवजी काँग्रेस ‘थांबा आणि पाहा’ अशी भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. जर शरद पवार यांच्या गटाचे विलिनीकरण अजित पवार यांच्या गटासोबत झाले, तर काँग्रेस वेगळा विचार करू शकते, अशीही चर्चा आहे. दरम्यान, भारत निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रातून सात जागांसह देशभरातील एकूण 37 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 16 मार्च रोजी मतदान होणार असून निकालानंतर राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होतील. विधानसभा निवडणुकीनंतर कमकुवत झालेल्या महाविकास आघाडीच्या ऐक्याची या निवडणुकीत खरी परीक्षा लागणार आहे. संख्याबळ पाहता महायुतीचे सहा उमेदवार तर महाविकास आघाडीचा केवळ एक उमेदवार विजयी होऊ शकतो. मतांच्या गणितानुसार राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी पहिल्या पसंतीची 37 मते आवश्यक आहेत. सध्याच्या बलाबलानुसार भाजपचे चार उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचा एक उमेदवारही निवडून जाऊ शकतो, मात्र त्यासाठी आघाडीतील सर्व पक्षांनी एकजूट दाखवणे गरजेचे आहे. महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवार यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. त्यांना काँग्रेस आणि उद्धवसेनेचा पाठिंबा मिळू शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र त्यांचे वाढते वय आणि प्रकृती लक्षात घेता ते पुन्हा राज्यसभेवर जाण्यास तयार होतील का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांनी नकार दिल्यास आघाडीला सर्वमान्य आणि तडजोडीचा उमेदवार शोधावा लागेल. भाजपकडूनही उमेदवारीबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षाकडून विनोद तावडे, विनय सहस्त्रबुद्धे आणि सुनील देवधर यांच्या नावांची चर्चा आहे. याशिवाय पोटनिवडणुकीत राज्यसभेवर गेलेले धैर्यशील पाटील ांनाही पुन्हा संधी मिळू शकते. केंद्रात मंत्री असल्याने भाजपच्या कोट्यातून रामदास आठवले यांना संधी देण्याबाबतही चर्चा सुरू आहे. सध्याचे संख्याबळ पाहिले तर भाजपकडे 131 आमदार आहेत. शिंदेसेनेकडे 57, राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडे 40, उद्धवसेनेकडे 20, काँग्रेसकडे 16, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाकडे 10 आणि अपक्ष व इतर मिळून 12 आमदार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनामुळे दोन जागा रिक्त आहेत. शिंदेसेनेकडून राहुल शेवाळे आणि संजय निरुपम यांच्या नावांची चर्चा आहे, तर अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. राजकीय समीकरणांची चाचणी ठरणार एकूणच राज्यसभा निवडणूक 2026 ही केवळ जागांची लढाई नसून आघाड्यांच्या ऐक्याची आणि भविष्यातील राजकीय समीकरणांची चाचणी ठरणार आहे. काँग्रेसची अट, राष्ट्रवादीतील संभाव्य विलिनीकरण आणि भाजपचे धक्कातंत्र यामुळे पुढील काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart