-
ज्योतिर्लिंग दर्शनावरून परतताना भीषण अपघात
-
कार दुभाजकावर आदळून उलटली
-
अपघातात तिघांचा मृत्यू
-
वाहनाचे मोठे नुकसान
पुण्यातील तीन जवळच्या मित्रांचा भीषण अपघातात मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. ज्योतिर्लिंग देवदर्शनासाठी गेले असता इंदूर-अहमदाबाद महामार्गावर दुभाजकाला कार धडकून हा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजस देविदास दगडे (वय २६), अभिषेक यादव (वय २६), सचिन बिरादार (वय २७) या दोन मित्रांसह बारा ज्योतिर्लिंग देवदर्शनासाठी दोन आठवड्यांपूर्वी गेले होते. मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास धाधेला वळणावर त्यांची कार दुभाजकावर आदळून अपघात झाला.
हा अपघात इतका भीषण होता की वाहनाचे इंजिन तुटून दूरवर शेतात फेकले गेले होते. या दुर्दैवी घटनेत गाडीचाही चक्काचूर झाला. ही कार दुभाजकावर धडकल्यानंतर उलटून जवळच्या शेतात सुमारे २० फूट खोलवर कोसळली. त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
मृत झालेल्या तरुणांपैकी तेजसने तांत्रिक अभियांत्रिकी शिक्षण घेतले होते. तो मांजरी बुद्रुक येथे मंगल कार्यालयाचा व्यवसाय करीत होता. त्याचे वडील पोलिस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झाले होते. तरुणांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.