जिल्ह्यात आजपासून दहावीची परीक्षा
धनंजय चोपडे; परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी उपाययोजना
नागठाणे, ता. १९ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीची परीक्षा उद्यापासून (शुक्रवारी) सुरू होत आहे. त्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) धनंजय चोपडे यांनी दिली.
जिल्ह्यात एकूण ११६ परीक्षा केंद्रे आहेत. दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३८ हजार ६६ इतकी आहे. त्यासाठी एकूण १५ परीरक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. परीक्षा शांततेत, तणावमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी या दृष्टीने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत पोलिस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता हनुमंत ढोक, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिस नायकवडी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जितेंद्र साळुंखे, शिक्षणाधिकारी (योजना) शबनम मुजावर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) धनंजय चोपडे आदींचा समावेश आहे.
परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांवर प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेराद्वारे व्हिडिओ चित्रीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. भरारी व बैठे पथकामार्फत परीक्षा केंद्रांना भेटीचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात परीक्षेतील व्यक्तिगत व सामूहिक गैरमार्गाच्या प्रकरणांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठी एकूण आठ भरारी पथकासह एक विशेष महिला भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे.
चौकट
मोबाईलला मनाई
परीक्षा केंद्रात कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण, मोबाईल फोन आदी आणण्यास मनाई करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेला वेळेआधी उपस्थित राहावे, तसेच प्रवेशपत्र, ओळखपत्र व हॉल तिकिटासह आवश्यक साहित्य सोबत असल्याची खात्री करून परीक्षा केंद्रावर विहित वेळेत पोहोचावे, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी केले आहे.
——————–