Actor Death: भारतीय चित्रपटसृष्टीनंतर आता इंग्रजी चित्रपटसृष्टीतून ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक टॉम नूनन यांच्या निधनाची हृदयद्रावक बातमी येत आहे. टॉम यांनी १४ फेब्रुवारी रोजी या जगाचा निरोप घेत वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
टॉम नूनन यांनी ‘लास्ट अॅक्शन हिरो’ आणि ‘रोबोकॉप २’ सारख्या अनेक उत्तम हॉलिवूड चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. १९८० मध्ये आलेल्या ‘विली अँड फिल’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या टॉम यांचे निधन हा चित्रपटसृष्टीसाठी मोठा धक्का आहे.
टॉम नूनन हे हॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्यांपैकी एक होते ज्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनाला भिडल्या आहेत. विशेषतः रोबोकॉप २ मधील त्यांचे पात्र कधीही विसरले जाणार नाही. त्यांची मैत्रीण आणि सह-कलाकार, ज्येष्ठ हॉलिवूड अभिनेत्री करेन सिलास यांनी बुधवारी सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांच्या निधनाची माहिती केली.
करेन म्हणाल्या, “माझा प्रिय मित्र आणि सह-कलाकार, टॉम नूनन यांचे गेल्या व्हॅलेंटाईन डेला निधन झाले. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला पॅराडाईज फॅक्टरी थिएटरमध्ये त्यांच्या मूळ ऑफ-ब्रॉडवे नाटक ‘व्हॉट हॅपन्ड वॉज…’ मध्ये त्यांच्यासोबत काम करणे हे माझ्यासाठी आणि माझ्या कारकिर्दीसाठी एक महत्त्वाचा टप्पा होता. माझ्या आयुष्यावर आणि अभिनेता म्हणून कामावर त्यांचा प्रभाव आजही आहे.”
टॉम नूननचे प्रमुख चित्रपट
टॉम नूननची अभिनय कारकीर्द १९८० ते २०१८ पर्यंत होती. या काळात त्यांनी ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या प्रमुख चित्रपटांमध्ये ,वुल्फेन, इझी मनी, बेस्ट डिफेन्स, मॅनहंटर, मिस्ट्री ट्रेन, रोबोकॉप २, लास्ट अॅक्शन हिरो, हीट, फिनिक्स, द अल्फाबेट किलर या चित्रपटांचा समावेश आहे.