
सिल्लोड तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वरूड खुर्द येथे नुकतेच आई-वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहण्यासाठी कटिबद्ध करणारा एक आगळावेगळा मातृपितृ पूजन सोहळा पार पडला. गावातील मान्यवर पदाधिकारी, माता-पिता पालक मंडळी यांच्या साक्षीने अत्यंत उत्साहात हा सोहळा पार पडला. सध्याच्या या धकाधकीच्या युगात खराब होत चाललेले आई-वडील आणि मुलांचे संबंध, वृद्धाश्रमांची झपाट्याने वाढत चाललेली संख्या, आजूबाजूला घडत असलेल्या डोळ्यांत अश्रू आणणाऱ्या घटना बघता आपल्या संस्कृतीचे जतन व्हावे, जिल्हाधिकाऱ्यांच्या दशसूत्रीअंतर्गत नैतिक संस्कारक्षम मूल्यांचा आपल्या मुलांच्या अंगी परिपोष व्हावा, त्यांचे व आपले भावी आयुष्य सुखी सुंदर व्हावे या उद्देशाने आईवडिलांचे पाद्यपूजन करण्यासाठी हा एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला गेला. कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेश थोरात होते. दीपक कळम (सरपंच), गुलाबदादा मिरगे (उपसरपंच), मधुकर मिरगे (चेअरमन) गणेश शेळके, शिंदे बाबा, कृष्णा गाडेकर, मधुकर मिरगे, सुधाकर मिरगे, गणेश थोरात, विमलताई जोगदंडे उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक सज्जन टाकसाळे यांनी केले. सूत्रसंचालन चापे मॅडम यांनी केले. आभार बोळेगावे मॅडम यांनी केले. प्रताप मिरगे, वंदना जोगदंडे, स्वाती चोरमारे या पालकांच्या मनोगताने आणि सज्जन टाकसाळे यांच्या माय कविता गायनाने उपस्थित सर्वांच्या डोळ्यात पाणी तरंगले. गणेश शेळके यांनी कार्यक्रमाची सर्व क्षणचित्रे टिपत काही पालकांच्या या कार्यक्रमाबाबत प्रतिक्रिया नोंदवून घेतल्या. वयस्कर पालक आणि आजींच्या बोलक्या प्रतिक्रिया आम्हास ऊर्जा देऊन गेल्या, असे शिक्षक सुनील जाधव यांनी सांगितले. हस्तलिखित विचारांनी वेधले उपस्थितांचे लक्ष विद्यार्थ्यांनी पाद्यपूजन करण्यासाठी सुरुवात केली असताना उपस्थित पालकांपैकी एक पालक अनिल ठाकरे यांनी संपूर्ण वैदिक मंत्रोच्चार करत कार्यक्रमाला वेगळीच शोभा आणून दिली. शाळेच्या परिसरात सज्जन टाकसाळे सरांनी लावलेले आई-वडिलांप्रति सद्भावना व्यक्त करणारे हस्तलिखित विचार उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.