कर्जमाफीची प्रक्रिया सुरू; वैजापुरात 8,682 शेतकऱ्यांची नावे थकबाकीत:30 जून ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची थकबाकीची माहिती बँकांकडून मागवली‎

कर्जमाफीची प्रक्रिया सुरू; वैजापुरात 8,682 शेतकऱ्यांची नावे थकबाकीत:30 जून ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची थकबाकीची माहिती बँकांकडून मागवली‎
वर्षानुवर्षे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला आहे. राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या हालचालींना वेग आला असून सहकार विभागाने ३० जून आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या थकबाकीची माहिती बँकांकडून मागवली आहे. विशेष म्हणजे १९९० पासूनचे थकबाकीदार आणि यापूर्वी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्यांचीही नोंद घेतली जात आहे. वैजापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे ८ हजार ६८२ शेतकरी थकबाकीत असून त्यांच्या खात्यावर तब्बल ३४ कोटी ८५ लाख ६७ हजार रुपयांचे कर्ज प्रलंबित आहे. या संभाव्य निर्णयाकडे तालुक्यातील हजारो शेतकरी कुटुंबांचे लक्ष लागले आहे. राज्यात शेतकरी वारंवार थकबाकीत का जातात याचा सखोल अभ्यास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. पाच-सात वर्षांनी पुन्हा कर्जमाफीची वेळ का येते, कोणत्या जिल्ह्यांतील शेतकरी सातत्याने थकबाकीत जातात, त्यांच्या पीकपद्धती, जमिनीचा प्रकार, सिंचन व हवामानाचा परिणाम काय होतो, याचा कृषी विभाग अभ्यास करत आहे. यासाठी माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून दीड महिन्यात अहवाल सादर होणार आहे.दरम्यान,वैजापूर तालुक्यात एकूण ३० हजार ४८५ कर्जदार शेतकरी असून १२९ कोटी ९० लाख ४७ हजार रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. त्यापैकी ८ हजार ६८२ शेतकरी थकबाकीत असून ३४ कोटी ८५ लाख ६७ हजार रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. त्यामुळे संभाव्य कर्जमाफीकडे वैजापूर तालुक्यात विशेष लक्ष लागले आहे. ४० हजार कोटींचा बोजा ३० जून २०२५ अखेर राज्यातील २४ लाख ७३ हजार ५६६ शेतकरी थकबाकीत असून त्यांच्या नावावर एकूण ३५ हजार ४७७ कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे. प्रस्तावित कर्जमाफीसाठी सुमारे ४० हजार कोटी रुपयांची तरतूद आवश्यक ठरणार असल्याचा अंदाज आहे. वैजापूर तालुक्यातील ८ हजार ६८२ शेतकरी थकबाकीत असून त्यांच्या खात्यावर ३४ कोटी ८५ लाख ६७ हजार रुपयांचे कर्ज बाकी आहे. त्यामुळे या संभाव्य निर्णयाकडे तालुक्यासह राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. ऑनलाइन माहिती देणार ३० जून व ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती बँकांकडून मागविली आहे. वैजापूर तालुक्यातील १६ शाखेतील माहिती मुख्य कार्यालयास पाठवली असून ती माहिती शासनाला ऑनलाइन सादर केली जाणार आहे. -आबासाहेब उगले, लोन ऑफिसर, वैजापूर

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart