डॉ. श्रीमंत कोकाटे
छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो वर्षांचीगुलामगिरी नष्ट करुन रयतेचे लोककल्याणकारीहिंदवी स्वराज्य स्थापन केले. हतबल झालेल्या भूमिपुत्रांच्या मनात धैर्य, शौर्य, आत्मविश्वास, स्वाभिमान आणि स्वराज्याची ज्योत पेटवली. शेतकरी, कष्टकरी, महिला, उपेक्षित समाजघटकांना धैर्य आणि स्थैर्य दिले. त्यांनी आपल्या राज्यात कधीही भेदभाव केला नाही. त्यांनी स्वराज्यातील आणि परराज्यातील स्त्रियांचा आदर केला. त्यांना सुरक्षितता दिली.
शिवाजीराजांचा इतिहास जसा ढाल-तलवारींच्या लढायांचा आहे, तसाच त्यांनी आदर्श राज्यकारभार केला व नियोजनबद्ध प्रशासनव्यवस्था निर्माण केली. त्यांचे राज्य केवळ एका घराण्याचे किंवा समूहाचे नव्हते, तर ते रयतेचे लोककल्याणकारी राज्य होते. त्यांच्या कार्याची, शौर्याची आणि उच्च कोटीतील नैतिकतेची तुलना समकालीन परकीयांनी जागतिक स्तरावर केलेली आहे.
ईस्ट इंडिया कंपनीच्या १६ जानेवारी १६७८च्या पत्राद्वारे मुंबई मुख्यालयाने त्यांच्या सुरत मुख्यालयाला लिहिले, की “शिवाजी महाराजांनी (दक्षिण दिग्विजियाचे) जे यश मिळविले आहे, त्या यशाने ते स्पेनमधील ज्युलियस सीझरप्रमाणे आनंदी असून ते आले, त्यांनी पाहिले आणि ते जिंकले.” ज्याप्रमाणे इ.स.पूर्व पहिल्या शतकात सीझरने युरोपमध्ये यश मिळविले, त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला, असे ‘ईस्ट इंडिया कंपनी’ने म्हटले आहे. तसाच उल्लेख शिवकाळात भारतात आलेला फ्रेंच प्रवासी अॅबे कॅरे करतो की “ठाम निश्चय आणि गनिमी कावा या गोष्टीमुळे शिवाजी महाराज युद्धामध्ये निर्णायक विजयी होत होते.
महाराजांचे शौर्य
शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय करुन रायगडाकडे परतत असताना इंग्रजांना त्यांची धास्ती वाटली. ते आपल्या १६७८च्या अहवालात म्हणतात की, “शिवाजी महाराज बंकापूरच्यानजीक आहेत. या परिसरातील दोन भक्कम गड त्यांनी जिंकले आहेत. आम्हाला त्यांची अलेक्झांडर दी ग्रेट प्रमाणे धास्ती वाटते.” ज्यांच्या साम्राज्याचा सूर्य कधीही मावळत नव्हता आणि ज्यांचे राज्य सुमारे अर्ध्या जगावर होते, अशा इंग्रजांना धास्ती वाटावी, असे शिवाजी महाराजांचे शौर्य आणि कार्य होते.
शिवाजी महाराज आग्य्राच्या बंदीवासातून निसटल्यानंतर गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नर साव्हिसेंति याने त्याच्या पोतुर्गाल राजाला कळविले की,“आग्य्रातून निसटल्यानंतर शिवाजी महाराजांनी अनेक देसायांना आपलेसे करून फोंडयाला आले आहेत. त्यांचे शौर्य, चातुर्य, चपळता आणि युद्धविषयी दूरदृष्टी पाहता, सीझर व अलेक्झांडरच्या गुणांचे स्मरण होते.” पोर्तुगीज शिवाजी महाराजांच्या शौर्याचे, चपळतेचे व युद्धकौशल्याचे वर्णन करतात.
वैश्विक कर्तृत्व
चौदा फेब्रुवारी १६७८ रोजी मुंबईकर इंग्रजी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल लिहितात की “मोगल आणि आदिलशहा दोघे मिळून ८० हजारांची फौज शिवाजी महाराजांना कायमचे नेस्तनाबूत करण्यासाठी घेऊन जाणार आहेत. पण शिवाजी महाराज हे दुसरे सर्टोरिअस किंवा युद्धकौशल्याच्या बाबतीत प्रती हॅनीबल आहेत” इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकात युरोपात क्विंटस सेर्टोरिअस आणि उत्तर अफ्रिकेतील हॅनीबल यांनी इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकात महापराक्रम गाजविला. शिवाजी महाराज हे तसेच महापराक्रमी आहेत, असे इंग्रजांना वाटत होते.
शिवकालीन फ्रेंच प्रवासी अॅबे कॅरे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल आणि गुणांबद्दल लिहितो की, “शिवाजी महाराज हे पूर्वेकडील देशांमधील आतापर्यंत होऊन गेलेल्या अत्यंत थोर राजांपैकी एक आहेत. या उदाहरणांवरुन स्पष्ट होते की, शिवाजी महाराजांचे मोठेपण किंवा कर्तृत्व एका देशापुरते किंवा राज्यापुरते मर्यादित नाही, तर ते वैश्विक पातळीवरील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महापराक्रमाची बातमी त्याच्या हयातीतच इंग्लंड येथून प्रकाशित होणाऱ्या ‘द लंडन गॅझेट’मध्ये फेब्रुवारी १६७२ मध्ये प्रकाशित झालेली आहे. यामध्ये म्हटले आहे, की “दोन दिवसांपूर्वी भारतातील सुरत येथील इंग्लिंश प्रेसिडेंटने कळविल्यानुसार त्यांना (इंग्रजांना) शिवाजी महाराजांमुळे रोजच भीती असते.”
इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज इत्यादी परकी सत्ताधीश शिवाजी महाराजांच्या शौर्याची, कार्याची तुलना जागतिक स्तरावर करतात. शिवाजी महाराजांचे शौर्य, धैर्य, चातुर्य, युद्धनीती आणि चपळता ही वैश्विक होती, याबाबत दुमत नाही, परंतु त्यांच्या नैतिकतेची तुलना सीझर किंवा अलेक्झांडरशी होऊ शकत नाही, कारण त्यांचे धोरण सत्ताकेंद्री साम्राज्यवादी होते, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण हे लोककल्याणकारी होते. त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. सर्वसामान्य घटकांना शासनव्यवस्थेत प्रतिनिधित्व दिले.
मध्ययुगीन कालखंड हा साम्राज्यवादी व राजेशाही शासनकाळ असतानादेखील त्यांनी लोकशाहीवादी भूमिका घेतली. शिवाजी महाराजांचे स्वराज्य न्यायावर, लोककल्याणावर आधारलेले होते. शत्रूंच्या स्त्रियांचादेखील आदर, सन्मान करुन त्यांना संरक्षण द्या, अशा सूचना त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिल्या. याचे वर्णन समकालीन पोर्तुगीज लेखक कॉस्मद ग्वादी, मोगल इतिहासकार खाफीखान आणि कृष्णाजी अनंत सभासदाने केलेले आहे. हे शिवाजी महाराजांचे मध्ययुगीन काळातील जागतिक वेगळेपण आहे.
स्वातंत्र्य, समता, स्त्रीवाद, मानवतावाद इत्यादी संकल्पना आधुनिक आहेत. ज्या युरोपात त्यांचा उदय झाला असे मानले जाते, त्या युरोपात शिवकाळात गुलामगिरीची पद्धत होती. पण शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात गुलामगिरी पद्धत बंद केली. दक्षिण दिग्विजयाच्या प्रसंगी डच व्यापाऱ्यांशी शिवाजी महाराजांशी व्यापार करार करण्यासाठी त्यांना निक्षून सांगितले की, “या ठिकाणी यापूर्वी तुम्ही स्त्री-पुरुषांना गुलाम म्हणून खरेदी-विक्री करत होता, परंतु आता मी हा भाग जिंकून घेतलेला आहे.
येथून पुढे माझ्या राज्यात स्त्री-पुरुषांना गुलाम म्हणून खरेदी-विक्री करता येणार नाही. जर तुम्ही तसा प्रयत्न केला तर माझे अधिकारी तुम्हाला कैदेत टाकतील”, असे स्पष्टपणे सांगितले. मध्ययुगात जगभर गुलामगिरी असताना, ती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात नव्हती. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जागतिक वेगळेपण आहे. शिवाजी महाराज पराक्रमी आणि नीतिमान राजे होते. सीझर, सिकंदर, नेपोलिएन पराक्रमी होते, परंतु शिवाजी महाराजांच्या ठायी असणाऱ्या राजकीय नैतिकतेचा अभाव त्यांच्याकडे होता. त्यामुळे शिवाजी महाराज हे त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आणि वेगळे ठरतात.
(लेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.)