
राज्यातील कमी पटसंख्येच्या १८ हजार शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात भंडाऱ्यात संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन (AISF) च्या नेतृत्वाखाली शेकडो विद्यार्थी आणि पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून सरकारचा निषेध केला. स्थानिक हुतात्मा स्मारकापासून निघालेल्या या मोर्चात प्राथमिक शाळांमधील शेकडो लहान मुले सहभागी झाली होती. “शिक्षण आमचा हक्क आहे”, “शाळा बंदी रद्द करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. काही विद्यार्थ्यांनी महामानवांची वेशभूषा करून शिक्षणाच्या अधिकाराची आठवण करून दिली. भंडारा जिल्ह्यातील १५५ शाळा बंद होणार असल्याने ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. दरम्यान, शासनाने हा निर्णय मागे घेतला नाही, तर संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. अशा आहेत मागण्या: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय तातडीने रद्द करा. दत्तक शाळा योजनेद्वारे होणारे शिक्षणाचे खाजगीकरण थांबवा. शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरा. शिक्षणावरील खर्च GDP च्या ६ टक्क्यांपर्यंत वाढवा. सरकारवर प्रश्नांची सरबत्ती यावेळी एआयएसएफचे राज्याध्यक्ष वैभव चोपकर यांनी सभेत सरकारवर टीका केली. ते म्हणाले, सरकार १६५ कोटी रुपये खर्चून मोफत दप्तरे वाटण्याच्या गप्पा मारत आहे, पण प्रत्यक्षात शाळांमध्ये शिक्षकच नाहीत. दप्तर कुणी मागितले? आम्हाला शिक्षक हवे आहेत. ज्या गावात रस्ते नाहीत, तिथे शासन प्रवास भत्ता देऊन विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावात कसे पाठवणार? अशा प्रश्नांची सरबत्ती केली.