
कुणबी जातीचा दाखला व जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी १३ हजारांची लाच घेताना आश्वी बु्द्रुक येथील तलाठी बाबासाहेब गंगाधर बोऱ्हाडे (४७) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. या कारवाईत दोन खासगी व्यक्तींनाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराने आवश्यक कागदपत्रांसाठी अर्ज केला असता बोऱ्हाडेने ६ हजार रुपये जातीचा दाखला व जात पडताळणीसाठी ७ हजार रुपये अशी एकूण १३ हजार रुपयांची मागणी केली. वारंवार होणाऱ्या मागणीला कंटाळून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक भारत तांबे, अपर पोलिस अधीक्षक माधव रेडी व सुनील दोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगरचे उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या पथकाने संगमनेर शहरातील तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला. खासगी व्यक्ती हितेश घोडके याने तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारून ती प्रतीक कातोरे याच्याकडे दिल्यानंतर पथकाने तिघांनाही रंगेहाथ पकडले. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.