
माहूर येथील मूळ रहिवासी व धर्माबाद येथील उर्दू प्रायमरी स्कूलचे निवृत्त शिक्षक चौधरी शेख हुसेन शेख अहमद (८२) यांचा निकाह परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले. त्यामुळे त्यांनी तेलंगणातील भैंसा येथील अमिनाबेगम अहमद हुसेन (५०) यांच्यासोबत निकाह केला. विशेष म्हणजे चौधरी शेख हुसेन शेख अहमद यांना तीन मुले, तीन मुली, तीन जावई आणि २२ नातवंडे आहेत. शेख हुसेन शेख अहमद हे नोकरीनिमित्त धर्माबादचे रहिवासी झाले. धर्माबादला त्यांचा विवाह खादरबी हुसेन साहेब यांच्याशी झाला. शेख हुसेन यांनी येथील उर्दू प्रायमरी स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून ३५ वर्षे सेवा केली. २२ वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले. धर्माबाद येथे ते कुटुंबासह वास्तव्याला आले. त्यांच्या काही नातवंडांचीही लग्ने झाली आहेत. मध्यंतरी दीड वर्षापूर्वी शेख हुसेन यांच्या पत्नी खादरबी यांचे निधन झाले. पत्नीच्या निधनानंतर ते एकटे पडले. मुले आणि सुनांबरोबर राहत असले तरी मनात एकटेपणाची जाणीव त्यांना होत होती. अखेर कुटुंबीयांच्या संमतीने त्यांनी निकाह करण्याचा निर्णय घेतला. पत्नी माझी ताकद:शेख हुसेन उर्वरित आयुष्य आनंदात आणि समाधानाने घालवायचे आहे. कुटुंबीय सोबत आहेत, पण जीवनाचा साथीदार महत्त्वाचा असतो. पत्नी अमिनाबी माझ्यासाठी मोठी ताकद असेल, असे चौधरी शेख हुसेन शेख अहमद यांनी सांगितले. स्वतःच वधूचा शोध घेतला शेख हुसेन यांनी स्वतःच वधूचा शोध घेतला. तेलंगणातील भैंसा येथील अमिनाबेगम अहमद हुसेन यांच्याशी त्यांच्या रेशीमगाठी जुळल्या. अखेर ३० जानेवारी रोजी निकाह पार पडला. आयुष्याच्या उत्तरार्धात सहचारिणी मिळावी या उद्देशाने त्यांनी हा निकाह केला.