शिवजयंती विशेष:छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पाया होता चारित्र्य; जाणता राजा असामान्य का, जाणून घेऊयात…!

शिवजयंती विशेष:छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पाया होता चारित्र्य; जाणता राजा असामान्य का, जाणून घेऊयात…!
राजेरजवाडे, सरंजामदारीच्या काळात स्रियांच्या अब्रूला कवडीमोल किंमत होती. दिवसाढवळ्या अब्रू लुटली जायची. कुणाकडे दाद मागता यायची नाही. या अत्याचाराला छत्रपती शिवाजी महाराजांनी लगाम लावला. लढाईत किंवा लूट करताना मुसलमान किंवा हिंदू कोणत्याही धर्माच्या स्त्रिया हाती आल्या, तर त्यांना तोषिस लागता कामा नये, अशा सक्त आज्ञा देत त्याचे पालन करायला लावले. चारित्र्य हा शिवरायांच्या स्वराज्याचा पाया होता. रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावू नका, अशी त्यांची आपल्या सैन्याला ताकद होती. छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. शिवरायांची शिकवण आचरणात आणणे, हेच खऱ्या अर्थाने त्यांचे स्मरण. शिवराय कसे होते, हे जाणून घेऊन रियासतकार गो. स. सरदेसाई, प्रा. त्र्यं. शं. शेजवलकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, नरहर कुरुंदकर आणि गोविंद पानसरे या प्रज्ञावंतांच्या नजरेतून… १) शिवरायांचा दृष्टिकोन वेगळा ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात गोविंद पानसरे म्हणतात की, ‘शिवाजी महाराजांच्या काळी आणि सरंजामदारीच्या काळात एकूणच स्त्रियांच्या अब्रूला विशेषतः गोरगरिबांच्या स्त्रियांच्या अब्रूला किंमत नव्हती. राजेरजवाडे व राजपुत्र तर सोडाच पण सरदार, वतनदार, जमीनदार, देशमुख, पाटील यांच्या दृष्टीने गोरगरिबांच्या लेकी-सुना म्हणजे त्यांना हव्या त्या वेळी उपभोगण्याच्या वस्तू होत्या. दिवसाढवळ्या त्यांची अब्रू लुटली जात होती आणि त्याविरुद्ध कुणाकडे दाद मागता येत नव्हती. ज्यांच्याकडे दाद मागायची तेच अब्रू लुटत होते, अब्रू लुटणाऱ्यांना मानमरातब अन् पदव्या देत होते. अशा काळात शिवाजीचा यासंबंधीचा दृष्टिकोन मूलतःच वेगळा होता. रांझ्याच्या पाटलाची गोष्ट प्रसिद्ध आहे. गावच्या वतनदार पाटलाने गरीब शेतकऱ्याच्या तरण्या पोरीला दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष उचलून नेली अन् भोगली. माती झालेल्या जिण्यापेक्षा मरण बरं, म्हणून पोरीनं जीव दिला. सारा गाव हळहळला. पण मुकाच राहिला.’ २) धर्माज्ञा बाजूला ठेवून न्याय ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात गोविंद पानसरे म्हणतात की, ‘सामान्य कुणब्याच्या पोरीवर बलात्कार केला म्हणून रांझ्याच्या पाटलास मुसक्या बांधून पुण्यास शिवाजीसमोर हजर केला अन् शिवाजीने त्यास शिक्षा फर्मावली. तेव्हा तो तिथे हजर असलेल्या दादोजी कोंडदेवांना म्हणाला, “पंत, गोतमुखाने न्याय व्हावा.” पाटलाच्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट आहे. न्याय करण्याचा अधिकार राजाचा, वरिष्ठ वर्णीयांचा, ब्राह्मणाचा किंवा जात पंचायतीचा. शिवाजी राजा नाही, तो वरिष्ठ वर्णाचा नाही, म्हणून त्याला शिक्षा देण्याचा अधिकार नाही. धर्मशास्त्राप्रमाणे काटेकोर रीतीने पाहायचे तर रांझ्याच्या पाटलाचे म्हणणे खरे होते. परंतु शिवाजीने धर्माज्ञा बाजूला ठेवून स्वतःच न्याय केला.’ ३) रांझ्याच्या पाटलाचे हातपाय तोडले गोविंद पानसरे पुढे म्हणतात की, ‘पाटील मानो अगर न मानो शिवाजीने पुढे येऊन हजर व्हायला त्याला निरोप पाठवला, तेव्हासुद्धा तो एकट्या स्वाराबरोबर आला नाही. उलट स्वारालाच म्हणाला होता, “तुझ्या शिवाजीला जाऊन सांग, तू नावाचा राजा आहेस. तसा मी नावाचा पाटील नाही. गावचा अधिकारी पाटील आहे. मी माझी प्रजा बटीक समजतो.” शिवाजीच्या कानी ही गोष्ट आली. पाटलाच्या मुसक्या बांधून पुण्याला आणले गेले आणि हातपाय तोडायची शिक्षा झाली. नुसती झाली नाही तर अमलात आली आणि साऱ्या मावळखोऱ्यात आश्चर्य पसरले, गरीब रयतेच्या पोरीची अब्रू घेतली म्हणून वतनदार पाटलाला जबर शिक्षा झाल्याचे पाहून रयत शिवाजीवर फिदा झाली अन् रयतेच्या अब्रूरक्षणासाठी शिवाजी कार्य करीत असेल तर त्या कार्यासाठी मरायला तयार झाली.’ ४) न्यायावर जबर निष्ठा होती गोविंद पानसरे पुढे म्हणतात की, ‘ज्यांच्या पाठबळावर राज्य करायचे अशा वतनदारांचीसुद्धा गय न करायला न्यायावर एक जबर निष्ठा लागते. शिवाजीपाशी ती होती म्हणून रयत शिवकार्यात सहभागी होती. आजही गोरगरीब रयतेच्या लेकी-सुनांवर खेडोपाडी अन् शहरांतसुद्धा अत्याचार अन् बलात्कार होतात पण शिवाजीचा वारसा सांगणारे अन् उठसूट शिवाजीच्या नावाचा जयघोष करणारे आज काय करतात? अत्याचार करणाऱ्याला शिक्षा होतात का? हात-पाय तोडायचे सोडा. कोर्टात केस तरी होते का? की अत्याचार करणारा जितका मोठा ‘वतनदार’, जितका मोठा ‘मालदार’ तितक्या लवकर त्याची सुटका होते? का अटकच होत नाही? लोकशाहीतसुद्धा शिवाजी आठवतो तो यामुळे. आठवावा तो यासाठी.’ ५) बलात्कारी सेनापतीचे डोळे काढले ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात गोविंद पानसरे म्हणतात की, ‘स्वतःच्या नातेवाईकांच्या अन् अधिकाऱ्यांच्या पापावर पांघरूण घालून पुन्हा वर कुणी शिवाजीचे नाव घ्यायला लागला, तर शिवाजीची आठवण करून त्याला जाब विचारायला पाहिजे. शिवाजी आठवावा तो यासाठी. रांझ्याच्या पाटलाची हकिगत हा अपवाद नाही. अशा इतरही कथा आहेत. 1678 मध्ये सकुजी गायकवाड नावाच्या सेनापतीने बेळवाडीच्या किल्ल्याला वेढा दिला. या किल्ल्याची किल्लेदार एक स्त्री होती. तिचे नाव सावित्रीबाई देसाई. या बहादूर स्त्रीने 27 दिवस किल्ला लढवला. पण सकुजीने शेवटी किल्ला जिंकला आणि विजयाच्या उन्मादात सूड भावनेने सावित्रीबाईवर बलात्कार केला. ही बातमी ऐकून शिवाजी संतापला. त्याने सकुजी गायकवाडचे डोळे काढावयास लावले व त्यास जन्मभर तुरुंगात डांबले. आपल्या विजयी सेनापतीने शत्रू असलेल्या स्त्रीवर बलात्कार केला म्हणून गय केली नाही. कारण शिवाजीची भूमिका होती, “स्त्रियांची इज्जत कायम राहिली पाहिजे. मग ती कुणी असो !’ ६) सौंदर्यासंबंधी निरोगी दृष्टिकोन ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात गोविंद पानसरे म्हणतात की, ‘कल्याणच्या सुभेदाराची सून दरबारात हजर केल्यानंतर तिच्यासंबंधी गैरउद्गार न काढता व गैरव्यवहार न करता तिची चोळी-बांगडी करून पाठवणी करण्याची कथा तर अनेक काव्यांचा विषय झाली आहे. मुसलमान शत्रूची तरणीताठी अन् देखणी सून पाहून आईची आठवण व्हावी अन् ‘आपलीही आई इतकी सुंदर असती तर काय झाले असते,’ असे उद्गार निघावेत यासाठी चारित्र्यसंपन्नता आणि सौंदर्यासंबंधीचा निरोगी दृष्टिकोन असावा लागतो. आजच्या भडभुंज्या तथाकथित शिवभक्त ‘वतनदारा’समोर अन् ‘राजासमोर’ अशी कुणी सुंदर स्त्री आली असती, तर त्यांनी काय उद्गार काढले असते अन् काय केले असते याची कल्पना करून पहा म्हणजे खरा शिवाजी अन् खोटे शिवभक्त यांच्यातला फरक उमगेल. लढाईत किंवा लूट करताना मुसलमान किंवा हिंदू कोणत्याही धर्माच्या स्त्रिया हाती आल्या तर त्यांना तोषिस लागता कामा नये व त्रास होता कामा नये, अशा सक्त आज्ञा शिवाजी महाराजांनी दिलेल्या आहेत व त्याचा अंमल करून घेतला आहे.’ ७) मोहिमेस कुणबिणी नेऊ नये ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात गोविंद पानसरे म्हणतात की, ‘त्या काळात हिंदू व मुसलमान, राजेरजवाडे, इनामदार यांचा लढाईस जाताना जनानखाने, कुणबिणी व कलावंतिणी बरोबर नेण्याचा रिवाज होता. परमुलखातल्या स्त्रियांना बटकिणी बनवण्याचा अन् भ्रष्ट करण्याचा परिपाठ होता. त्या काळी शिवाजी महाराजांनी सक्त हुकूम दिला होता की, ‘मोहिमेस जाताना कुणीही बटकिणी, कुणबिणी अगर कलावंतिणीस बरोबर घेऊ नये. कुणाही स्त्रीस बटकीण बनविता कामा नये. “21 व्या शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतातील ‘पुरोगामी’, ‘न्यायी’ महाराष्ट्र राज्यात आजही स्त्रियांवर बलात्कार होतात अन् बलात्काराकडे दुर्लक्ष करणारे इतकेच नव्हे, तर बलात्कार करणाऱ्यास पाठीशी घालणारे शिवाजीच्या नावाने जयजयकार करतात आणि आपण शिवाजीचे वारसदार आहोत म्हणून सांगत फिरतात. समजा, शिवाजी आज आला तर या शिवभक्तांचे काय करील?’ ८) स्त्रीस तोषीस देता कामा नये गोविंद पानसरे पुढे म्हणतात की, ‘खाफीखान या मुस्लीम इतिहासकाराने नोंदवून ठेवलेला हा उतारा खूप बोलका आहे. “शिवाजीने सैनिकांकरिता असा सक्त नियम केला होता की, सैनिक ज्या ज्या ठिकाणी लूट करण्यास जातील; तेथे तेथे त्यांनी मशिदीस, कुराण ग्रंथास अथवा कोणत्याही स्त्रीस तोषीस अगर त्रास देता कामा नये. जर एखादा कुराणाचा ग्रंथ हाती आला तर त्याबद्दल पूज्यभाव दाखवून तो आपले मुसलमान नोकरांच्या स्वाधीन करीत असे. केव्हाही हिंदू किंवा मुस्लीम स्त्रिया हाती सापडल्यास व त्यांचे रक्षण करण्यास कोणी जवळ नसल्यास त्यांचे नातलग त्यांची सुटका करण्यास येईपर्यंत शिवाजी स्वतः तिची काळजी करीत असे.’ ९) उपासना वेगळी, उद्देश एकच ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात गोविंद पानसरे म्हणतात की, ‘शिवाजीचा काळ लक्षात घेता शिवाजीचे हे धोरण व त्याचे विचार अनन्यसाधारण असेच आहेत. कारण धर्माचा लोकजीवनावर मोठा प्रभाव होता. पण आपल्या धर्माइतकाच इतरांचा धर्मही श्रेष्ठ व उच्च आहे आणि उपासना पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी त्याचा उद्देश एकच आहे. हे महत्त्वाचे तत्त्व शिवाजीने मांडले. अकबर, दारा शुकोह, इब्राहिम आदिलशहा यांचे विचारही यापेक्षा वेगळे नव्हते. शिवाजी हा धार्मिक राजा होता. तो हिंदू धर्माचा अभिमानी होता व त्याने हिंदू देवळांना व ब्राह्मणांना इनामे दिली; या गोष्टी खऱ्या आहेत पण त्याचा हिंदू धर्माचा अभिमान इतर धर्मीयांच्या द्वेषावर आधारलेला नव्हता. मुसलमानांचा द्वेष केल्याशिवाय आपणास श्रेष्ठ हिंदू बनता येत नाही, असे त्याला कधीच वाटले नाही. कारण मध्ययुगातदेखील त्याची धर्मसाधना डोळस होती.’ १०) सभासद बखरतेला उताराच सांगतो ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात गोविंद पानसरे म्हणतात की, ‘सभासदाच्या बखरीतील हा उतारा पहा. “मुलखात देव-देवस्थाने जागोजागी होती. त्यास दिवाबत्ती, नैवेद्य, अभिषेक स्थान पाहून यथायोग्य चालविले. मुसलमानांचे पीर, मशिदी, त्यांचे दिवाबत्ती, नैवेद्य, स्थान पाहून चालविले. जी गोष्ट मशिदींची तीच गोष्ट मुस्लीम साधुसंतांची. शिवाजी आणि त्या काळातील इतरही मराठे-हिंदू दर्ग्याना भजत व देणग्या देत. मुस्लीम साधू, पीर, फकीर यांना मान देत. शिवाजी महाराज अनेकांना गुरू मानतात त्यात ‘याकुतबाबा’ या एका मुस्लीम संताचाही समावेश आहे. मुस्लीम धर्माबद्दल शिवाजी महाराजांची सहिष्णुता अनेक रीतीने इतिहासात नमूद आहे.’ ११) इतिहासाशी इमान राखून ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात गोविंद पानसरे म्हणतात की, ‘शिवाजी हिंदू होता. त्याची धर्मावर श्रद्धा होती. त्या श्रद्धेप्रमाणे तो वागत होता. देव-देवतांना आणि साधुसंतांना पूजत होता. धर्मासाठी व देवळांसाठी दान देत होता व खर्च करीत होता. पण तो इस्लाम धर्माच्या विरुद्ध होता काय? तो हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवत होता, म्हणजे मुस्लीम धर्माचा द्वेष करीत होता काय? मुसलमानांचे ‘हिंदूकरण’ किंवा ‘महाराष्ट्रीयीकरण’ करण्याचा त्याचा इरादा वा प्रयत्न होता काय? इतिहासाशी इमान राखून खरे बोलायचे, तर या साऱ्या प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ अशी आहेत. शिवाजीने सुरतेच्या केलेल्या दोन्ही वेळच्या लुटीची तपशीलवार वर्णने उपलब्ध आहेत. जुन्नरची बाजारपेठ लुटल्याची व अशाच इतरही लुटीची वर्णने आहेत. पण एक तरी मशीद पाडल्याचे उदाहरण इतिहासात नमूद आहे काय ? निदान मुळात मंदिर असलेली पण मुसलमानांनी मशिदीत रूपांतर केले अशी तरी मशीद पाडून तिथे पुन्हा मंदिर बांधल्याची नोंद आहे काय? मुळीच नाही. याउलट मशिदींना दान व इनामे दिल्याच्या नोंदी मात्र आहेत.’ १२) प्रजेत धर्मावरून भेद नाही ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात गोविंद पानसरे म्हणतात की, ‘2 नोव्हेंबर 1669 च्या एका पत्रात रघुनाथ पंडितरावांनी राजांची आज्ञा उल्लेखली आहे ती तर त्याहून स्पष्ट आहे. ते लिहितात, “श्रीमंत महाराज राजे यांनी ज्याचा जो धर्म त्याचा त्यांनी करावा. यात कोणी बखेडा करू नये असे फर्मावले आहे. मुस्लीम धर्माविरुद्ध स्वतःची मते लोकमान्य करण्यासाठी जे कुणी शिवाजीचा वापर करीत असतील किंवा करतील त्यांना वरील ऐतिहासिक बाबींचा जाब द्यावा लागेल. त्यांचा मुस्लीम धर्मद्वेष कुठे खपत असेल तर त्यांनी तो स्वतः च्या नावाने खपवावा. त्यांच्या मालावर शिवाजीचा शिक्का मारून खपवू नये. तो माल शिवाजीचा म्हणून खपवू नये. तसेच मुस्लीम धर्मीयांनी सांप्रतच्या तथाकथित शिवभक्तांच्या कारवाया व भाषणे पाहून शिवाजीस ओळखू नये. शिवाजीचा इतिहास पहावा आणि शिवाजीचा मुस्लीम धर्मासंबंधीचा दृष्टिकोन समजावून घ्यावा अन् मग काय ते ठरवावे. शिवाजी स्वतः हिंदू होता व धर्मश्रद्ध होता, परंतु राजा म्हणून त्याने स्वतःच्या राज्यातील प्रजेत धर्मावरून भेद केला नाही. हिंदूंना एक वागणूक व मुस्लिमांना दुसरी वागणूक असे केले नाही. मुसलमानांना ते वेगळ्या धर्माने म्हणून पक्षपातीपणाने वागवले नाही. ही बाब जशी हिंदूंनी लक्षात घ्यावी तशीच ती मुस्लिमांनीसुद्धा लक्षात घ्यावी.’ १३) औरंगजेबाचे पक्षपाती धोरण ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात गोविंद पानसरे म्हणतात की, ‘मुसलमान धर्मात अकबरासारखे परधर्म सहिष्ण राजे होऊन गेले तसेच, औरंगजेबासारखे हिंदूंवर जिझिया कर लादून एकांगी पक्षपात करणारेही होऊन गेले. औरंगजेबाने धर्मांध मुल्ला-मौलवींच्या सांगण्यावरून जिझिया कर बसवला. त्या कराच्या विरुद्ध उठाव झाला त्या सुमारास शिवाजी महाराजांनी औरंगजेबास फारसी भाषेत एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रातील मजकुरावरून स्वधर्माकडे व परधर्माकडे कसे पहावे या संबंधीचा दृष्टिकोन अगदी खुलासेवार स्पष्ट होतो.’ १४) अकबर, जहांगीर, शहाजहानचा दाखला पानसरे पुढे म्हणतात की, ‘आपल्या पत्रात शिवाजी लिहितो की, “औरंगजेबाने गरीब व निराधार प्रजेकडून जिझिया कर वसूल करण्याचे जे धोरण स्वीकारले आहे ते मुगल राजसत्तेच्या मूळ सिद्धान्ताच्या विरुद्ध आहे. औरंगजेबाचे पणजे अकबर बादशाहा यांनी 52 वर्षे राज्य केले. त्या काळात सर्वांना न्यायाने वागविले. त्यामुळे त्यांना जनतेने जगद्गुरू अशी पदवी दिली. त्याचेच धोरण पुढे जहांगीर व शहाजहान या बादशहांनी चालविले. त्यांच्या या धोरणामुळे त्यांची जगभर प्रसिद्धी झाली. हे बादशहा सहज जिझिया कर वसूल करू शकले असते पण त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे त्यांना दिगंत कीर्ती व पैसा मिळाला. त्यांचे राज्य वाढत राहिले पण औरंगजेबाच्या राज्यात मात्र हिंदू व मुसलमान शिपाई दु:खी आहेत. धान्याचे भाव वाढले आहेत. अशात गरीब ब्राह्मण, जोगी, बैरागी, जैन साधू व संन्यासी यांच्याकडून जिझिया कर घेणे फारशी पुरुषार्थाची बाब नाही. त्यामुळे खरे पाहिले असता मुघल वंशाचीच शान जाणार आहे.” १५) साऱ्या जाती ईश्वरापाशी एकरंग गोविंद पानसरे पुढे म्हणतात की, ‘औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात शिवाजी पुढे म्हणतो की, “कुराण धर्मग्रंथ ही प्रत्यक्ष ईश्वराची वाणी आहे. ते अस्मानी किताब आहे. त्यात ईश्वरास ‘जगाचा ईश्वर’ म्हटले आहे. ‘मुसलमानांचा ईश्वर’ असे म्हटलेले नाही. कारण हिंदू व मुसलमान या जाती ईश्वरापाशी एकरंग आहेत. मुसलमान लोक मशिदीत बांग देतात, ती भगवंताची स्तुतीच होय आणि हिंदू लोकही देवळात घंटा वाजवून ईश्वराची स्तुतीच करतात. म्हणून जातिधर्मावर जुलूम करणे भगवंताशी वैरत्व करणे होय. कारण शास्त्र व न्याय या दोन्हीही दृष्टीने विचार केला तरी जिझिया पट्टी ही गैर आहे.” १६) राज्य प्रजेच्या असंतोषात भस्म होते गोविंद पानसरे म्हणतात की, ‘शिवाजीने औरंगजेबास असे लिहिले आहे की, “त्याने विवेकास फाटा देऊ नये. यापूर्वी गुजरातच्या सुलतानाने असाच विवेकास फाटा दिला होता पण त्याचा परिणाम चांगला झाला नाही. त्याप्रमाणे बादशहाचं होईल. कारण कोणताही ज्वालाग्राही पदार्थ अग्रीच्या सान्निध्यात नष्ट होतो. त्याचप्रमाणे कोणतेही राज्य प्रजेच्या असंतोषात भस्म होते. मनुष्यास विनाकारण उपद्रव केला असता निर्माण होणारा द्रोहाग्नी हा राळापेक्षाही जलद दौलत भस्म करू शकतो. म्हणून बादशहाने आपापले स्वधर्मात सर्व जातींबद्दल मनात विकल्प ठेऊन कोणत्याही प्रकारचा जुलूम करू नये. कारण राज्यातील प्रजा, कीटक न्याये गरीब आहे. परंतु हिंदू लोकांस दुःख दिले असता त्याचे द्रोहाग्नीत संपूर्ण साम्राज्य नष्ट होईल.’ १७) राजा हा देवाचा अंश असतो ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात गोविंद पानसरे म्हणतात की, ‘शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी विरोध केला होता. त्यावरून किंवा महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी मिर्झाराजे जयसिंग यांना यश मिळावे म्हणून कोटी चंडी यज्ञ केला होता. त्यावरून महाराष्ट्रातले सर्व ब्राह्मण शिवाजीच्या विरुद्ध होते असा कुणी निष्कर्ष काढला, तर तो मात्र पूर्णतया चूक ठरेल. हा प्रश्न केवळ व्यक्तिगत या किंवा त्या ब्राह्मण समूहाचा नव्हता किंवा या किंवा त्या पुरोहिताचा नव्हता. प्रश्न मूळ चातुर्वर्ण्य धर्माचाच होता व आजही आहे. शूद्र हे प्रजापतीच्या पायापासून जन्माला आले. वरील तिन्ही वर्णांची सेवा करणे हे त्यांचे धर्मकर्तव्य आहे. त्यांना राजा होता येणार नाही अशी धर्माज्ञा आहे. राजा हा देवाचा अंश असतो आणि शूद्रात देवाचा अंश असणे शक्य नाही. म्हणून शूद्र राजा होऊ शकत नाही. असा धर्माचा आग्रह आहे.’ १८) प्रश्न मूळ चातुर्वर्ण्य धर्माचा होता गोविंद पानसरे पुढे म्हणतात की, ‘मुसलमान राजा होऊ शकतो. पण शूद्र होऊ शकत नाही. अशी सनातन हिंदू धर्माची रीत आहे. म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला धर्माचाच विरोध होता. नुसता ब्राह्मणांचा नव्हता. शिवाजीच्या स्वराज्य उद्योगात अनेक ब्राह्मण साथीदार होते. दादोजी कोंडदेव हे तर त्यांचे गुरूच होते. रामदासाने शिवाजीला उपदेश व मार्गदर्शन केले की नाही याबाबत कडाक्याचे वाद आहेत. ते तज्ज्ञांवर सोपवून आपण बाजूस ठेवले तरी दादोजींच्या भूमिकेसंबंधी शंकेला जागा नाही. मोरापंत पिंगळे हे तर पेशवे पदावर होते. ते एक मुख्य प्रधान होते. मोरोपंत, अण्णाजी दत्तो व दत्ताजी त्रिंबक हे प्रधान तर होतेच पण मोठे कुशल वीर होते. शिवाजीची आग्र्याहून सुटका करून घेण्याच्या रोमांचकारी घटनांना त्र्यंबकपंत डबीर आणि रघुनाथपंत कोरडे ह्या महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी आणि कृष्णाजी काशी व विसाजी या उत्तरेकडील ब्राह्मणांनी मोलाची मदत केल्याची इतिहासाने नोंद केलेली आहे.’ १९) ‘संस्कारक्षया’च्या आक्षेपांना उत्तर ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात गोविंद पानसरे म्हणतात की, ‘प्रश्न नुसता ब्राह्मणांचा नव्हता तर सनातन हिंदू धर्माचा होता. त्या काळाच्या मर्यादांचा होता व या मर्यादा शिवाजीनेसुद्धा स्वीकारून मान्य केल्या होत्या. म्हणून सकृत दर्शनी आज हास्यास्पद दिसणाऱ्या गोष्टी त्या काळात घडल्या. ‘संस्कारक्षय’ झाला वगैरे आक्षेपांना उत्तर म्हणून गागाभट्टाने शिवाजी महाराजांची मुंज 44 व्या वर्षी केली. मंत्रविधींसह पुन्हा विवाह केला. दान- दक्षिणा म्हणून लक्षावधी सुवर्ण मोहरांची उधळण करावी लागली आणि मग राज्याभिषेक झाला. ‘हिंदू धर्मरक्षक’ म्हणून शिवाजीला बिरुदावली लावणाऱ्या आजच्या तमाम मतलबी धर्मांधांनी ही गोष्ट विसरू नये की, याच हिंदू धर्माने व याच धर्माच्या रक्षकांनी शिवाजीला राज्याभिषेक करायला विरोध केला होता व 44 व्या वर्षी मुंज आणि एकदा झालेला विवाह पुन्हा दुसऱ्यांदा करणे असल्या हास्यास्पद गोष्टी करविल्या होत्या.’ २०) राजा असूनही रयतेची कदर केली गोविंद पानसरे पुढे म्हणतात की, ‘अर्थात हिंदू धर्म मानणाऱ्या शिवाजीलासुद्धा या काळाच्या आणि धर्माच्या मर्यादा होत्या. प्रत्येक थोर पुरुषाला काळाच्या मर्यादा असतात, परिस्थितीच्या मर्यादा असतात. तशा त्या शिवाजीलासुद्धा होत्या. गौरव करण्याच्या भरात तारतम्य सोडून काही वेळा शिवाजी महाराजांचा काळनिरपेक्ष गौरव केला जातो. शिवाजीचे राज्य ‘धर्मनिरपेक्ष राज्य होते, ‘शिवाजी खरा ‘समाजवादी’ होता इत्यादी हास्यास्पद विधानेसुद्धा काही मंडळी करतात. अर्थात ते खरे नाही, हे स्पष्ट आहे. सरंजामी समाजरचनेच्या काळात स्वतः एक राजा असलेला शिवाजी धर्मनिरपेक्ष असणे शक्य नव्हते, समाजवादीही असणे शक्य नव्हते. शिवाजी त्याच्या समकालीनांपेक्षा किती लांब पल्ल्याचा विचार करी हे महत्त्वाचे. त्या परिस्थितीतही त्याने किती दूरदृष्टीचा विचार केला आणि त्या परिस्थितीतही त्याने किती प्रगतिशील पावले उचलली, राजा असूनही रयतेची कशी कदर केली हे महत्त्वाचे.’ २१) मराठे सरदार राजास मानत नव्हते ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात गोविंद पानसरे म्हणतात की, ‘त्या काळी शिवाजी महाराजांना शूद्र किंवा ‘हलक्या जातीचा’ समजणाऱ्यांत महाराष्ट्रातील फक्त ब्राह्मणच होते असे नाही. स्वतःला क्षत्रिय म्हणविणारे 96 कुळीचे मराठे सरदारही शिवाजीचा ‘राजा’ म्हणून सुरुवातीस हक्क मानत नव्हते. या अहंमन्य कुळीत 96 नावे आहेत. त्यात ‘भोसले’ हे नाव नाही. अजूनही कर्मठपणाने जातपात पाहून सोयरसंबंध ठरवणारे आणि स्वतःला उच्च मराठे समजणारे ‘भोसले’ आडनावाच्या मराठ्यांना हलके समजतात. त्या काळी जवळ जवळ सर्वच 96 कुळीचे मराठे स्वतःस ‘राजे’ म्हणवत. शिंदे राजे, मोरे राजे इत्यादी. त्यांची राज्ये नव्हती. पण ते स्वतःस राजे म्हणवत. नगर जिल्ह्यात व आजूबाजूस अजूनही जवळ जवळ सर्व मराठे (आणि इतर काहीसुद्धा) स्वतःच्या आडनावापुढे पाटील लावतात. जसे लांडगेपाटील, कोल्हेपाटील, काळेपाटील, विखेपाटील इत्यादी सारेच पाटील.’ २२) मोरे म्हणाले, ‘तुम्ही राजे कसे?’ गोविंद पानसरे पुढे म्हणतात की, ‘स्वतःला राजे म्हणवणारे तेव्हाचे 96 कुळीचे मराठे शिवाजीबरोबर कसे वागत याची एक कथा नमूद आहे. जावळीचे मोरे हे विजापूरशाहीचे एक सरदार होते. त्यांना ‘राजे’ म्हणत. शिवाय त्यांना चंद्रराव ही पदवी होती. या जावळीच्या मोऱ्यांनी आपल्या स्वराज्य कार्यात सहभागी व्हावे म्हणून शिवाजीने प्रयत्न केले. पत्रे पाठवली. दूत पाठविले. ऐकेना, तेव्हा जरबेचा खलिता पाठविला अन् इशारात केली की जर ऐकणार नसतील तर जावळी काबीज करू आणि कैद करू, या पत्रात शिवाजीने स्वतःस राजे असे संबोधले होते. या पत्रास जावळीच्या मोऱ्यांनी उर्मटपणाने पाठवलेले पत्र मिळाले आहे. त्या पत्रात मोरे म्हणतात, “तुम्ही राजे कसे? तुम्ही स्वतःला राजा म्हणवून घेता म्हणून तुम्ही राजे? तुम्ही जेवत असाल तर हात धुवायला जावळीत या. आमचे युद्ध होऊ द्या!” अर्थात शिवाजीने मोऱ्यांची इच्छा पूर्ण केली. युद्ध केले व जावळी जिंकली हा भाग वेगळा. जावळीचे मोरे स्वतःला राजे म्हणवत परंतु शिवाजीला ‘राजा’ मानायला तयार नव्हते, ही या संदर्भातील महत्त्वाची गोष्ट.’ २३) वतने देण्याच्या विरुद्ध होते ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात गोविंद पानसरे म्हणतात की, ‘शिवाजीलासुद्धा ज्ञानेश्वर, तुकाराम, म. गांधी यांच्यासारखेच विकृत करायचा कार्यक्रम बराच काळ सुरू आहे. सध्याही चालू आहे. शिवाजी वतने देण्याच्या विरुद्ध होता. त्याने आयुष्यभर वतने देण्याचे टाळले. आताचे प्रस्थापित शिवभक्त नवी नवी वतने तयार करीत आहेत. वतनदारांना सांगत आहेत की तुमच्या वतनात तुम्ही हवे ते करा. रयतेला हवे तसे लुटा. खा, प्या, मजा करा. आमचे राज्य चालवायला आम्हाला मदत करा म्हणजे झाले. म्हणजे आम्हीसुद्धा रयतेला लुटू. तुम्ही थोड्या प्रमाणात लुटा. आम्ही मोठ्या प्रमाणात लुटू. तुम्ही हजारांत, क्वचित लाखांत खा. आम्ही कोटींत खाऊ. शिवाजीच्या काळातील वतने आता नाहीत हे खरे. पण नवी वतने आणि नवे वतनदार वाढताहेत. झेड. पी.ची वतने सर्व जिल्ह्यांत आहेत. साखरसम्राट म्हणजे नवे वतनदारच आहेत. वेगवेगळी कार्पोरेशन्स म्हणजे वतनदाऱ्या आहेत. मोठ्या सहकारी संस्था, म्युनिसिपालट्या, आमदारक्या, खासदारक्या यांना वतनाचे स्वरूप आले आहे आणि या वतनदाऱ्या आता वंशपरंपरेने दिल्या-घेतल्या जात आहेत.’ २४) शिवरायांची शिकवण अंगी बाणवा ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात गोविंद पानसरे म्हणतात की, ‘लोकशाहीत सत्तेचे विकेंद्रीकरण हवेच, त्याला विरोध कुणी करणार नाही. पण विकेंद्रीकरण म्हणजे वतनदारी नव्हे. शिवाजीच्या काळात वतनदार जसे जनतेला छळीत त्यापेक्षा हे नवे वतनदार जास्त छळतात. साखरसम्राटाच्या विरुद्ध कुणी एखादा रयत गेला तर तो संपलाच. त्याला कर्ज मिळत नाही, खत मिळत नाही, त्याचा ऊस जात नाही. दोन वर्षांत तो बरबाद होतो अन् एक बरबाद झाला की दुसरे दहा जण धजत नाहीत अन् वतनदारांचे वतन घट्ट होते. रयतेच्या पोरीबाळींवर या नव्या वतनदारांचा डोळा आहे की नाही? बलात्कार होताहेत की नाही? रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावू नका म्हणून शिकवून गेलेल्या शिवाजीच्या महाराष्ट्रात नव्या राजांची, सरदारांची अन् वतनदारांची सरबराई करण्यात रयत रंजीस येते की नाही? आणि हे सारे ‘शिवाजी महाराज की जय’ म्हणत सुरू असतं. हे अगदीच भयानक. शिवाजी हे सारं पाहायला असता तर? त्याने काय केले असते? तो नाही हे खरे आहे. तो स्वतः येणार नाही हेसुद्धा तितकंच खरं आहे. पण त्याची शिकवण आहे ना? त्याची शिकवण अंगी बाणून नव्या वतनदारांवर प्रहार करणे हेच खरे शिवाजीचं स्मरण करणे होय.’

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart