![]()
मोहोळ तालुक्यातील सारोळे येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त जय हनुमान तालीम संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य जंगी कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या स्पर्धेत “श्री सिद्धेश्वर केसरी २०२६” या मानाच्या किताबासाठी महाराष्ट्रातील नामांकित मल्लांमध्ये चुरशीच्या लढती रंगल्या.या विशेष कुस्ती मैदानाचे उद्घाटन आमदार राजू खरे व सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात आले. श्री सिद्धेश्वर केसरी २०२६ – ट्रिपल महाराष्ट्र चॅम्पियन” पै. श्रीनिवास पाथरूट आणि पै. अरमान पटेल यांच्यातील मानाचा अंतिम सामना खेळविण्यात आला. अत्यंत अटीतटीच्या आणि रोमहर्षक झालेल्या या लढतीत पै. श्रीनिवास पाथरूट यांनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत विजय मिळवला आणि “श्री सिद्धेश्वर केसरी २०२६” या किताबाचे मानकरी ठरले.आरंभ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पाथरूट यांच्या वतीने व विठ्ठल पाथरूट यांच्या स्मरणार्थ श्रीनिवास पाथरूट यांना चांदीची गदा सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.स्पर्धेत राज्यातील विविध भागांतील नामांकित तसेच उदयोन्मुख मल्लांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक सामन्यात मल्लांनी ताकद, चिकाटी आणि तांत्रिक कौशल्याचे उत्कृष्ट दर्शन घडवले. याच कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद सदस्य चरणराज चवरे,नगरसेवक बिज्जू प्रधाने, नगरसेवक व्यकटेश कोंडी, नगरसेवक युवराज सरवदे, अक्षय अजिखाने, विश्वास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जय हनुमान तालीम संघाचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.