Thursday, February 26, 2026
HomeNewsMartahiगॅस बिल भरण्याच्या नावाखाली फसवणूक:सायबर चोरट्यांचा हैदोस, पुणे पोलिसांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे...

गॅस बिल भरण्याच्या नावाखाली फसवणूक:सायबर चोरट्यांचा हैदोस, पुणे पोलिसांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

गॅस बिल भरण्याच्या नावाखाली फसवणूक:सायबर चोरट्यांचा हैदोस, पुणे पोलिसांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
पुण्यात सायबर चोरट्यांनी गॅस पुरवठा खंडित करण्याची धमकी देऊन दोन नागरिकांना तब्बल 16 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. खराडी आणि विमाननगर परिसरात घडलेल्या या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका ज्येष्ठ महिलेसह एका पुरुषाची फसवणूक झाली आहे. खराडी येथील एका 72 वर्षीय ज्येष्ठ महिलेची 11 लाख 94 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. 11 फेब्रुवारी रोजी सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाईलवर संपर्क साधला. पाईपद्वारे गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीतून बोलत असल्याचे भासवून, थकीत गॅस देयक न भरल्यास पुरवठा खंडित करण्याची धमकी दिली. चोरट्यांनी महिलेला थकीत देयकासाठी एक एपीके (APK) फाईल पाठवली. ती फाईल उघडताच, चोरट्यांनी महिलेच्या बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवली आणि त्या माहितीचा गैरवापर करून तिच्या खात्यातून 11 लाख 94 हजार रुपये काढून घेतले. या प्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण तपास करत आहेत. अशाच प्रकारे, विमाननगर येथील एका 45 वर्षीय नागरिकाची 5 लाख 37 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. 10 फेब्रुवारी रोजी त्यांना थकीत गॅस देयकाबाबतचा संदेश आला. त्यासोबत पाठवलेली एपीके फाईल उघडताच त्यांच्या खात्यातून पैसे चोरीला गेले. या घटनेप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शेळके पुढील तपास करत आहेत. गेल्या आठवड्यात शिवाजीनगर परिसरातही अशाच प्रकारची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. गॅस आणि वीज पुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून शहरात फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. सायबर चोरटे एपीके फाईलच्या माध्यमातून गॅस, वीज देयके तसेच वाहतूक नियमभंगाचे चलन पाठवतात. नागरिकांनी अशा बनावट संदेशांकडे दुर्लक्ष करावे आणि कोणतीही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

Tutorial de trading en gate.io on Insurance Agency Lead Scoring