जात वैधता समितीवर पक्षपात, भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप:अध्यक्षांसह सदस्यांच्या निलंबनाची मृणाल ढोले-पाटील यांची मागणी

जात वैधता समितीवर पक्षपात, भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप:अध्यक्षांसह सदस्यांच्या निलंबनाची मृणाल ढोले-पाटील यांची मागणी
ओबीसी कार्यकर्ते मृणाल ढोले-पाटील यांनी पुणे जात वैधता समितीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी समाज कल्याण आयुक्त, महाराष्ट्र राज्य, दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे लेखी तक्रार सादर करत समिती बरखास्त करण्याची मागणी केली आहे. समितीचे अध्यक्ष अमोल यादव तसेच सदस्य संजय दाणे आणि शिवकांत चिकुटे यांच्या कार्यपद्धतीत गंभीर अनियमितता, पक्षपात आणि संभाव्य भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ढोले-पाटील यांनी केला आहे. ही तक्रार अलीकडील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमधील २७ निवडून आलेल्या नगरसेवकांनी सादर केलेल्या कथित बनावट ओबीसी जात दाव्यांबाबत हे प्रकरण आहे. या संदर्भात २४ जानेवारी २०२६ रोजी लेखी तक्रार देऊन सुनावणीची मागणी करण्यात आली होती, मात्र समितीने तक्रारीची दखल न घेता इतर प्रकरणांची सुनावणी पुढे चालू ठेवल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने समिती सदस्यांना विचारणा केली असता, त्यांना “चूक झाली” असे उत्तर देण्यात आले. हे उत्तर असमाधानकारक असून कृती जाणीवपूर्वक केल्याचा संशय ढोले-पाटील यांनी व्यक्त केला आहे. सतत पाठपुरावा केल्यानंतरच दोन सुनावण्या निश्चित करण्यात आल्या आणि मर्यादित हस्तक्षेपाची परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. ढोले-पाटील यांनी पत्रात संबंधित अध्यक्ष व सदस्यांचे तात्काळ निलंबन, विभागीय चौकशी, नवीन निष्पक्ष समितीची स्थापना, तक्रारदारांना पोलिस संरक्षण आणि सर्व सुनावण्यांचे अधिकृत व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची मागणी केली आहे. दोषींवर कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. आरक्षित जागा व न्याय्य प्रतिनिधित्वाशी संबंधित असल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart