
पुणे-सातारा महामार्गावरील कात्रज येथील जांभुळवाडी बोगद्याजवळ आज एका भरधाव डंपरने 4 ते 5 वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने काळजाचा ठोका चुकवणारा भीषण अपघात झाला असून, या धडकेनंतर डंपरने अचानक पेट घेतल्यामुळे तो पूर्णपणे जळून खाक झाला आहे. या थरारक घटनेत 4 ते 5 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा महामार्गावरील जांभुळवाडी बोगद्याजवळ डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला असून, या अनियंत्रित डंपरने समोरील चार ते पाच वाहनांना अक्षरशः उडवल्याने मोठी खळबळ उडाली. या धडकेचा वेग इतका प्रचंड होता की अपघातानंतर अवघ्या काही क्षणातच डंपरने पेट घेतला, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य आणि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्यातील 4 ते 5 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवले आहे. जांभूळवाडी बोगदा, नवले ब्रिज आणि वडगाव ब्रिज हा पट्टा आता अपघातांचे भीषण केंद्र बनला असून, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट आहे. काही दिवसांपूर्वीच नवले ब्रिजवर झालेल्या कंटेनर-कारच्या भीषण धडकेत 7 जणांचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाही, रोजच्या वाढत्या अपघातांवर आळा घालण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याचे चित्र आहे. आज झालेल्या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असून, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.