मृतांच्या नावे कोट्यवधींचा डल्ला!

मृतांच्या नावाने कोट्यवधींची फसवणूक
पनवेल, ता. १८ (वार्ताहर) : पनवेलमध्ये दलालांच्या एका टोळीने मृत व्यक्ती जिवंत असल्याचा बनाव करून त्यांच्या नावावर असलेली ४७ गुंठे जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्यवहारात बांधकाम व्यावसायिकाची तब्बल दोन कोटी २९ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. विशेष म्हणजे ज्या मूळ जमीनमालकांच्या नावाने हा व्यवहार करण्यात आला त्यांचा इस्राईलमध्ये अनुक्रमे २०११ आणि २०१६ साली मृत्यू झाल्याचे तपासात उघड झाले आहे. प्रकरण समोर येताच पनवेल शहर पोलिसांनी संबंधित दलालांविरोधात फसवणूक व बनावटगिरीचा गुन्हा दाखल केला आहे.

नाथन एलियाहू चिंचोलकर आणि शालोम एलियाहू चिंचोलकर हे दोघे पूर्वी पनवेलमध्ये वास्तव्यास होते. नंतर ते इस्राईलमध्ये स्थायिक झाले. त्यांचे वारस सध्या इस्राईल आणि अमेरिकेत राहतात. नाथन यांचा २०११मध्ये, तर शालोम यांचा २०१६मध्ये मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्या नावावर करंजाडे येथील ४७ गुंठे जमीन असल्याची आणि वारस भारतात नसल्याची माहिती मिळताच दलालांच्या टोळीने बनावट कागदपत्रे तयार करून जमीन बळकावण्याचा डाव रचला. खारघर येथील बांधकाम व्यावसायिक प्रशांत पाटेकर (५५) यांच्यासोबत खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यात आला. आरोपींनी मृत व्यक्तींच्या नावांशी साधर्म्य असलेल्या दोन तोतया व्यक्तींना दुय्यम निबंधक, पनवेल-१ कार्यालयात उभे करून बनावट ओळखपत्रांच्या आधारे व्यवहार पूर्ण केला आणि पाटेकर यांच्याकडून दोन कोटी २९ लाख ५० हजार रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटेकर यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दोन तोतया व्यक्ती, एजंट सूरज वासुदेव शिंदे आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पोवार अधिक तपास करीत आहेत.

Online Maharashtra
Logo
Compare items
  • Total (0)
Compare
0
Shopping cart