उल्हासनगर, ता. १८ (वार्ताहर) : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड नाही, असा संदेश देत उल्हासनगर शहर वाहतूक विभागाने शाळा बस आणि व्हॅनचालकांवर बुधवारी (ता. १८) धडक तपासणी मोहीम राबवली. शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळ होऊ नये, यासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि चालकांची अल्कोहोल चाचणी करत वाहतूक पोलिसांनी सजगतेचे उदाहरण घालून दिले आहे.
उल्हासनगर शहरातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शहर वाहतूक विभागाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत शाळा बस आणि व्हॅनची कागदपत्रे, वाहनांची तांत्रिक स्थिती, फिटनेस सर्टिफिकेट, विमा, परवाना यांची तपासणी करण्यात आली. तसेच वाहनचालकांची अल्कोहोल चाचणी करून ते मद्यप्राशन करून वाहन चालवत नाहीत ना, याची खात्री करण्यात आली.
वाहतूक विभागाच्या या अचानक तपासणीमुळे अनेक वाहनचालकांमध्ये खळबळ उडाली. काही वाहनचालकांना नियमांचे पालन करण्याबाबत सूचना दिल्या, तर किरकोळ त्रुटी आढळलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात येईल, अशी कोणतीही बाब सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी दिला.
या कारवाईत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पंढरीनाथ काळे, संतोष भोईर, संजय बेंद्रे, जितेंद्र चित्ते, मनोज काळे, नाना आव्हाड, भारत खांडेकर आणि रणजीत खोत यांनी सक्रिय सहभाग घेतला. शहरातील शाळांच्या परिसरात आणि प्रमुख मार्गांवर ही मोहीम राबवण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देत यापुढेही अशा तपासण्या नियमितपणे केल्या जातील, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही वाहतूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.