३२८ अनधिकृत नळजोडण्या झाल्या अधिकृत
ठाणे महापालिकेच्या अभय योजनेला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : ठाणे पालिका क्षेत्रातील पाणी चोरी व अनधिकृत नळजोडणीवरून पालिका प्रशासनावर चौफेर टीका करण्यात येत आहे. अशातच शहरातील पाणीचोरी रोखण्यासाठी आणि अनधिकृत नळजोडण्यांना अधिकृत चौकटीत आणण्यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनाने अभय योजना हाती घेतली आहे. या योजनेला ठाणेकरांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत आहे. गेल्या १० महिन्यांत या योजनेअंतर्गत ३२८ अनधिकृत नळजोडण्या अधिकृत करण्यात आल्या असून, त्यातून पालिकेला सुमारे २१ लाख ८३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
महापालिकेने २०११ पासून अनधिकृत नळजोडण्यांवर बंदी घालून कारवाई सुरू ठेवली असली, तरी बेकायदा जोडण्यांचे प्रमाण कमी होत नव्हते. त्यामुळे नागरिकांना दंड आकारून जोडण्या अधिकृत करून घेण्याची संधी देण्यासाठी अभय योजना लागू करण्यात आली. १ एप्रिल २०२५ ते २९ जानेवारी २०२६ या कालावधीत झोपडपट्टी भागातील ३२८ जोडण्या नियमित करण्यात आल्या. या प्रक्रियेत प्रशासकीय शुल्कातून सहा लाख ३२ हजार, तर पाणीपट्टीतून १५ लाख ५१ हजार असे २१ लाख ८३ हजार १४० रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. घरगुती वापरासाठी जोडणी अधिकृत करताना प्रति ग्राहक तीन हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
दरम्यान, मुंब्रा आणि दिवा परिसरात पाणीचोरीचे प्रमाण लक्षणीय असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने विशेष मोहीम राबवत फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांत तब्बल एक हजार ४०८ अनधिकृत नळजोडण्या तोडल्या. यापूर्वीही एप्रिल महिन्यात केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर बेकायदा जोडण्या उघडकीस आल्या होत्या. काही ठिकाणी जमिनीखाली लपवून ठेवलेल्या जोडण्या सापडल्या, तर काही भागांत बोरवेलच्या माध्यमातून पाणी साठवून टँकरद्वारे पुरवठा केला जात असल्याचे निदर्शनास आले.