
हर हर महादेव, बम बम भोले, नागनाथ महाराज की जयच्या जयघोषामध्ये बुधवारी (ता. १८) रात्री महाशिवरात्री यात्रेनिमित्त नागनाथ मंदिरामध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सव साजरा झाला. नागनाथ मंदिराला पाच प्रदक्षिणा घेण्यात आला. यावेळी भाविकांच्या गर्दीने नागनाथ मंदिर फुलुन गेले होते. देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्रीनंतर रथोत्सवाचे मुख्य आकर्षण असते. या रथोत्सवासाठी बुधवारी दुपार पासूनच भाविक नागनाथ मंदिरात येण्यास सुरवात झाली होती. रथोत्सवाचा सोहळा पाहण्यासाठी भाविक जागा मिळेल त्या ठिकाणी उभेे राहिले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे १ लाख भाविक या सोहळ्यासाठी नागनाथ मंदिरात दाखल झाले होते. दरम्यान, संस्थानच्या वतीने दुपारपासून रथोत्सवाची तयारी सुरु करण्यात आली होती. फुलांच्या माळा तसेच दिपोत्सवांनी रथ सजविण्यात आला होता. रात्री नागनाथांची मुर्ती रथा मध्ये ठेवण्यात आली. आमदार संतोष बांगर, देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरिष गाडे यांच्या हस्ते पुजा करण्यात आली. यावेळी महंत शामगिरी महाराज, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, नगराध्यक्ष कपील खंदारे, उपनगराध्यक्ष मनोज देशमुख, वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. श्रीधर घुगे, मुख्य पुजारी तुळजादास भोपी, हरिहर भोपी, देवस्थानचे अधिक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ यांची उपस्थिती होती. त्यानंतर रात्री दहा वाजता ‘हर हर महादेव, ओम नमः शिवाय, नागनाथ महाराज की जय. बम बम भोले’चा गजर करताच नागनाथ मंदिर कर्मचारी यांनी रथ ओढला. नागनाथ मंदिराला रथाच्या पाच प्रदक्षिणा घेण्यात आल्या. यावेळी भजनी मंडळ, बँड पथक सहभागी होते. रथोत्सवासाठी सुमारे एक लाख भाविक मंदिरात उपस्थित होते.