तपोवन वृक्षतोडप्रकरणी स्थगिती कायम
सहा एप्रिलला पुढील सुनावणी; महानगरपालिकेला अतिरिक्त वेळ
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २० : कपिला नदी व तपोवन परिसरातील वृक्षतोड प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) शुक्रवारी झालेल्या सुनावणीत महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. वृक्षतोडीवरील स्थगिती आदेश कायम ठेवण्यात आला असून पुढील सुनावणी सहा एप्रिल रोजी होणार आहे.
सुनावणीदरम्यान हरित लवादासमोर सादर करण्यात आलेल्या अहवालाची प्रत अद्याप पर्यावरणप्रेमी व स्थानिक संघटनांना मिळालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती मिळवण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पर्यावरण संघटना व नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, नाशिक महानगरपालिकेला आपली बाजू मांडण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. पुढील सुनावणीवेळी महानगरपालिकेकडून सविस्तर भूमिका मांडली जाणार असून, त्यानंतर न्यायालय पुढील निर्णय घेणार आहे. कपिला नदी परिसरात झालेल्या वृक्षतोडीच्या संदर्भात दाखल अर्जावर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिसीद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना वृक्षतोडीमागील कारणे स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रशासनावर उत्तरदायित्वाची जबाबदारी अधिक वाढली आहे. ही प्रकरणे तपोवन परिसरातील वृक्षतोडीशी संबंधित असून राष्ट्रीय हरित लवादामध्ये त्यांची सुनावणी सुरू आहे. याबाबतची माहिती ॲड. श्रीराम पिंगळे यांनी दिली. कपिला नदी व तपोवन परिसरातील पर्यावरणीय संतुलनाचा प्रश्न गंभीर बनला आहे.