
सोलापूर महापालिकेत १० स्वीकृत सदस्य घेण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत. प्रत्येकी १० नगरसेवकांमागे एक असे त्याचे सूत्र आहे. एकूण १०२ पैकी भाजपचे ८७नगरसेवक आहेत. त्यांना राष्ट्रवादीच्या एकाचा पाठिंबा असल्यामुळे भाजपला ९ स्वीकृत नगरसेवकपद मिळू शकतात, तर ८ नगरसेवक असलेल्या एमआयएमला एक पद मिळेल. मात्र भाजपकडे इच्छुकांची गर्दी मोठी असल्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नावे गुलदस्त्यातच ठेवली आहेत. ९ जागांसाठी भाजपकडून सुमारे २५ जणांनी बुधवारी अर्ज दाखल केले, तर एमआयएमकडूनही तिघांनी अर्ज दाखल केले. दिवसभरात एकूण ६२ इच्छुकांचे अर्ज सादर झाल्याचे नग्रसचिवांनी सांगितले. मात्र पक्षनिहाय उमेदवारांची नावे जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला. शुक्रवारी होणाऱ्या मनपाच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत या १० स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर केली जातील. बुधवारी अर्ज सादर करण्यासाठी वेळ दुपारी ११ ते १.३० वाजेपर्यंत होती. सकाळी ११ वाजता भाजपचे ज्येष्ठ नेते प्रभाकर जामगुंडे यांनी अर्ज दाखल केला. यानंतर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यासह जगदीश पाटील, श्रीनिवास दायमा, अक्षय अंजिखाने, शशी थोरात, सुधा अळ्ळीमोरे यांनी एकत्र जाऊन अर्ज भरला. नंतर टप्प्याटप्प्याने श्रीकांत घाडगे, जवाहर जाजू, अनुम खंडेलवाल, केतन शहा, वृषाली चालुक्य, पांडुरंग दिड्डी, अॅड. राजन दीक्षित, अॅड. साधना संगवे, सूरज चव्हाण, कृष्णा झंवर, महेश तापडिया, लक्ष्मीकांत दरक, चंद्रकात तापडिया, मल्लिनाथ राचेटी, सोमनाथ केंगनाळकर, रुद्रेश बोरामणी, रुद्रेश कंगनाळकर, देवेंद्र भंडारे, नागेश भोगडे, सचिन कुलकर्णी, जय साळुंखे, पत्रकार मनीष केत आदींनी अर्ज दाखल केले. भाजपमधील काही जण महापौर कक्षात जाऊन त्यांची परवानगी घेऊन येऊन अर्ज भरत होते. अगदी अखेरच्या काही मिनिटांत वृषाली चालुक्य यांनी धावत पळत येऊन अर्ज भरला. अनेकांनी अपक्ष म्हणूनही अर्ज भरले आहेत. एमआयएमकडून गाजी जहागिरदार, नईम सालार, फिरदोस पटेल यांनी अर्ज भरला. पटेल यांनी पाठीमागच्या दाराने येऊन अर्ज भरला. या पक्षात स्वीकृतवरून अंतर्गत वाद आहेत पण पक्षाने सालार यांच्या नावाला पसंती दिली आहे. नानांची नुसतीच चर्चा, पण अर्ज भरला नाही मनपा निवडणुकीपूर्वी भाजपात आलेले नाना काळे यांचा पराभव झाला. त्यांना स्वीकृतची संधी मिळेल, अशी चर्चा होती पण पराभूतांना स्वीकृत करणार नाही, असे रोहिणी तडवळकर यांनी जाहीर केले होते. त्यामुळे नानांना संधी मिळते की नाही याकडे लक्ष आहे. बुधवारी दिवसभर नाना अर्ज भरण्यात आले नाहीत. आमदार देवेंद्र कोठे यांच्या आत्या कुमूद अंकाराम यांना कोठेंनी निवडणुकीतून माघार घ्यायला लावली होती. त्यांची स्वीकृत म्हणून वर्णी लागेल, अशी अपेक्षा होती पण त्यांनाही संधी मिळाली नाही. भाजप उद्याच ऐनवेळी देणार नऊ नावे भाजपकडे मनपा निवडणुकीत उमेदवारीपासूनच इच्छुकांची रिघ आहे. म्हणूनच अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी एबी फॉर्म वाटपाची खेळी खेळली होती. आता स्वीकृतसाठीही त्यांच्याकडे ९ जागा आहेत. मात्र २०० हून अधिक इच्छुकांनी अर्ज केले होते. त्यापैकी नऊ जणांची नावे कशी निवडायची असा पक्षासमोर प्रश्न आहे. ही नाराजी टाळण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे प्रदेशच्या नेत्यांच्या आदेशाचे कारण पुढे करत शुक्रवारी बंद लखोट्यात ९ नावे पाठवतील तीच अंतिम होतील. भाजपने सांगितले तर अध्यक्षपदही सोडेन भाजपने २० जणांना अर्ज दाखल करण्यासाठी सांगितले होते. अनेक जण इच्छुक आहेत तेही अर्ज दाखल करत आहेत. अंतिम निर्णय पक्षाचा आहे. मीही इच्छुक असल्याने अर्ज दाखल केला, मात्र पक्ष जो निर्णय घेईल तो अंतिम असेल. पक्षाने मला स्वीकृत नगरसेवकपद दिले आणि शहराध्यक्षपद सोडायला सांगितले तर मी सोडेन. माझ्यासाठी पक्षाचा आदेश अंतिम आहे. – रोहिणी तडवळकर, भाजप शहराध्यक्षा एमआयएमचे उमेदवार नईम सालारच एमआयएमने नईम सालार यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत अर्ज भरायला आलोय. याशिवाय आमच्या पक्षाचे जे कोणी कार्यकर्ते किंवा पदाधिकारी अर्ज भरत असतील तर त्याबद्दल आम्हाला माहित नाही. इच्छा व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण आमच्याकडून सालार हेच अधिकृत उमेदवार असतील. इतरांविषयी काही माहिती नाही. – वाहिदा शेख, गटनेते, एमआयएम प्रशासनाने नावे लपवली, पुन्हा खिडकीतून अर्जाचा संशय दुपारी १.३० वाजेपर्यंत सर्व इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांचे नाव व पक्ष मनपा प्रशासनाने जाहीर केली नाहीत. एकूण ६२ अर्ज आल्याचे नगरसचिवांनी सांगितले पण नावांबाबत लपवाछपवी केली. त्यामुळे या प्रक्रियेत पारदर्शीपणा दिसला नाही. मनपा निवडणुकीवेळीही अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपचे एबी फॉर्म खिडकीतून दाखल झाले होते, तसेच स्वीकृतसाठीही अंधारातून काही जणांचे अर्ज तर दाखल केले जात नाहीत ना, अशा शंका नगर सचिवांच्या लपवाछपवीमुळे उपस्थित केल्या जात होत्या. देशमुखांच्या शिफारशींवर फुली, मंत्री गोरे सांगतील त्यांनाच पदे स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपच्या कोट्यातून जागा मिळवण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकीची तिकिटं मिळवण्यासाठी ज्याप्रमाणे भाजपमध्ये तीन आमदारांमध्ये अंतर्गत स्पर्धा होती, तशीच स्पर्धा आताही सुरू आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भूमिका यात निर्णायक राहणार आहे. आमदारांनी निष्ठावंतांना बाजूला सारून पक्षात सक्रिय नसलेल्या आपल्या काही समर्थकांच्या नावांची शिफारस केली आहे. पण गोरे यांनी हा डाव उधळून लावला आहे. भाजप निष्ठावंत हा एकमेव निकष ठेवूनच स्वीकृत नगरसेवक निवडले जातील, असे संकेत देत पक्षाकडून आमदार विजयकुमार देशमुख व आमदार सुभाष देशमुख यांच्या शिफारशी अमान्य करण्यात आल्याचे सांगितले जाते. उत्तर विधानसभा मतदारसंघातून पक्षात सक्रिय नसलेल्या काही नावांसाठी देशमुखांनी शिफारस केली होती. पण पालकमंत्र्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. यानंतर आमदार सुभाष देशमुख यांचे निकटवर्ती शशी थोरात यांच्या नावाची चर्चा झाली. नंतर देशमुखांनी आपले पुत्र मनीष देशमुख यांचे नाव केले, त्यामुळे थोरात यांचे नाव मागे पडले. मात्र देशमुखांच्या घरात उमेदवारी देण्यास गोरे राजी नाहीत. आमदार देवेंद्र कोठे यांच्या शब्दानुसार त्यांचे भाऊजी विनायक कोड्याल यांना महापौरपद देण्यात आले. आता आणखी काही समर्थकांना नगरसेवकपद देण्यासाठी त्यांचा गोरेंकडे आग्रह आहे. त्यात अक्षय अंजिखाने, सागर अतनुरे यांचा समावेश आहे. रोहिणी तडवळकर यांचे नाव निश्चित मानले जाते पण त्यांनी साधना संगवे, सुधा अळ्ळीमोरे यांच्यासाठी आग्रह धरला. या दोघी अनेक वर्षांपासून संघटनात्मक कामात सक्रिय आहेत. मारवाडी समाजातून सहा जणांचे अर्ज मारवाडी समाजाला भाजपाने महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिलीच नाही. त्यामुळे स्वीकृतसाठी तरी एकाला संधी मिळावी यासाठी मारवाडी समाजाने पाठपुरावा सुरू केला आहे. कोणी आमदार विजयकुमार देशमुख, कोणी आमदार देवेंद्र कोठे, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे वशिला लावत आहे. या समाजातून एकूण सहा जणांनी अर्ज भरले. त्यापैकी श्रीनिवास दायमा यांच्या नावासाठी आग्रह जास्त आहे.