
पाथर्डी तालुक्यातील सोनोशीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत मोठ्या गटातील मुलींच्या खो-खो संघाने जिल्हा अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धेत तालुक्याच्या संघांनी उल्लेखनीय कामगिरी केली. मुलांच्या मोठ्या गटातील संघाने पहिल्या फेरीत अटीतटीच्या लढतीत विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्यानंतर पारनेर तालुक्यातील कोहकडी शाळेच्या संघाशी झालेला सामना रंगतदार ठरला. निर्धारित वेळेत सामना ५-५ असा बरोबरीत सुटला. अतिरिक्त वेळेतही ४-४ अशीच स्थिती कायम राहिली. अखेर कोहकडी संघाने बाजी मारली. मुलांचा संघ उपांत्य फेरीत थांबला; मात्र मुलींच्या संघाने जबाबदारी खांद्यावर घेत उपांत्य व अंतिम सामन्यात एकतर्फी विजय मिळवत जिल्हा अजिंक्यपद मिळवले. लहान व मोठ्या गटातील मुलींच्या खो-खो संघांनी जिल्हा अजिंक्यपद मिळवले, तर लहान गट मुलांच्या खो-खो संघाने जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक पटकावला. तसेच वैयक्तिक लांब उडी प्रकारातही तृतीय क्रमांक मिळवत विद्यार्थ्यांनी सर्वांगीण कामगिरीची नोंद केली. या यशामागे मुख्याध्यापक देविदास बडे, शिक्षक अण्णासाहेब साळुंके, अमोल भंडारी यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.